मुरूड तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून रेवदंडा पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ पासून संशयित तरुणाचे पीडित मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या कालावधीत संशयिताने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. याबाबत तरुणाला माहिती मिळाल्यानंतर त्याने पीडितेला टाळण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेमुळे पीडित मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर तिने रेवदंडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी (ता. २१) संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती, संशयिताची भूमिका तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव आंगज करीत आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीतील सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत असून, तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे रेवदंडा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या ओळखीबाबत गोपनीयता राखण्यात आली आहे.