अलिबागमध्ये IESP प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन; स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

अलिबाग | अमुलकुमार जैन
माझ्या वाडीतला मुलगा नोकरीला लागला पाहिजे, हीच माझी खरी इच्छा आहे, अशी भावनिक हाक देत शेकाप महिला प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग परिसरातील तरुणांना रोजगार आणि कौशल्य विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला. पीएनपी येथे आयईएसपी (IESP) प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग आणि रायगड परिसरात एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामध्ये एअरपोर्ट आणि एअरलाइन्स व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. अलिबाग हे नवी मुंबई विमानतळामुळे अत्यंत स्ट्रॅटेजिक ठिकाण बनले आहे. त्यामुळे येथील तरुणांना योग्य प्रशिक्षण मिळाले, तर त्यांच्यासाठी रोजगाराची मोठी दारे खुली होतील, असे त्या म्हणाल्या.
आज २० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे बायोडेटा समोर आले की एकच विचार मनात येतो, या मुलांना रोजगाराशी कसे जोडायचे? म्हणूनच आयईएसपीसारख्या प्रतिष्ठित संस्थेचे प्रशिक्षण केंद्र येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
IESP Pvt. Ltd. ही संस्था एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षणासाठी ओळखली जाते. एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट मॅनेजमेंट, कॉर्पोरेट ट्रेनिंग तसेच कम्युनिकेशन स्किल्स, ग्रूमिंग आणि एअरपोर्टवरील आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण येथे दिले जाते. विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट सहाय्य, हॉस्टेल आणि ईएमआय सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात.
चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, टीम चित्रलेखा पाटीलने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र फोरम उभारले आहे. मागील आठवड्यातच १६ युवकांना लोडर आणि ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळवून देण्यात आली. गावागावातील युवकांना रोजगाराशी जोडण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
यावेळी आयएसपी संचालक ग्यानी खन्ना यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. येथे सेंटर सुरू करण्यासाठी आमची पहिली बैठक अत्यंत सकारात्मक झाली. ‘माँ’ची टीम आणि आयएसपीच्या टीमने अतिशय वेगाने काम करून हे सेंटर उभे केले. विमानतळ आणि हॉस्पिटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, त्यासाठी मेहनत, योग्य प्रशिक्षण आणि आत्मविश्वास आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकांना आवाहन करताना त्यांनी म्हटले की, “मुलांना घराबाहेर पडू द्या, नवीन क्षेत्रांचा अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा द्या. यावेळी अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रशांत नाईक, पीएनपी मरीन फ्रंट लाइनचे कार्यवाह नृपाल पाटील, उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, पाणी पुरवठा सभापती अनिल चोपडा, नगरसेवक अंकित बंगेरा, प्रदीप नाईक, राष्ट्रवादीचे अॅड. प्रवीण ठाकूर, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, तसेच अॅड. कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे अलिबाग, मुरुड, रोहा आणि परिसरातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून, स्थानिक युवकांना ‘गगनभरारी’ घेण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.