घरफोडी व चोरीच्या सवयीचा एक संशयित इसम अलिबाग शहर परिसरात सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध अलिबाग पोलिसांकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर संशयित इसम हा घरफोडी व चोऱ्या करण्याच्या सवयीचा असून आज पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास तळकर नगर परिसरातून पळताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत परिसरात शोधमोहीम सुरू केली असून नियमित गस्त वाढवण्यात आली आहे. अलिबाग पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, संशयिताच्या वर्णनाशी मिळतीजुळती व्यक्ती कुठेही दिसून आल्यास स्वतः कोणतीही कारवाई न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. घरांची योग्य खबरदारी घेणे, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवणे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना कळवणे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी नागरिकांनी शांतता राखत पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगितले आहे. संशयिताबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ अलिबाग पोलीस ठाणे किंवा पोलीस निरीक्षक किशोर साळे (मो. 9284389289) यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.