रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात पूर्वी कार्यरत असलेला हिरकणी कक्ष गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. सदर खोलीचा वापर सध्या फिंगरप्रिंट मशीन आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत असून, यामुळे महिला पोलीस कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात महिलांच्या गरजा लक्षात घेऊन हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला होता. स्तनदामाता, महिला पोलीस कर्मचारी यांना विश्रांती आणि स्तनपानासाठी हा कक्ष उपयुक्त ठरत होता. मात्र सध्या तो बंद असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची मानसिक व शारीरिक कुचंबना होत आहे.
“हिरकणी कक्ष नसल्यामुळे आमच्यावर अतिरिक्त तणाव येतो. बाळंतीण महिला किंवा बाळासोबत येणाऱ्या महिला यांच्यासाठी हा कक्ष अत्यंत आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिली.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले, “रायगड पोलिस विभागाकडे फिंगरप्रिंट मशीन आले आहे. जागेअभावी हिरकणी कक्षात ती ठेवावी लागली आहे. लवकरच दुसऱ्या ठिकाणी नव्याने हिरकणी कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”