अलिबागमधील हायप्रोफाईल सोसायटीवर पोलिसांची पहाटे धाड; गांजा सेवनप्रकरणी दोघांवर कारवाई, युक्रेनियन महिला अडचणीत

अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हायप्रोफाईल सोसायटीवर पहाटे धाड टाकत गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य करणारी युक्रेनची महिला आढळून आल्याने तिच्याविरुद्धही इमिग्रेशन आणि फॉरेनर्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५/२०२६ अन्वये एनडीपीएस अॅक्ट १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब) आणि २७ तसेच इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ च्या कलम २३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (दि. १४) पहाटे मौजे सारळ, ता. अलिबाग येथील इनर सर्कल सोसायटीमधील बी-०६ क्रमांकाच्या फ्लॅटवर संयुक्त कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता संबंधित ठिकाणी काही व्यक्ती पार्टी करत असल्याचे आढळून आले.
यावेळी दोन व्यक्ती कागदी नळीत भरलेला पदार्थ पेटवून त्याचा धूर ओढताना दिसून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते गांजाचे सेवन करत असल्याचे स्पष्ट झाले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सुनिल बळीराम चावला (वय ६९, रा. इनर सर्कल सोसायटी, सारळ) आणि हरेंद्र सिंग मंगल सिंग (वय ६५, रा. वरळी, मुंबई) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून गांजा भरलेल्या कागदी नळ्या, अर्धवट जळालेली गांजाची नळी तसेच लायटर जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून सुमारे ३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्यानंतर दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान घटनास्थळी युक्रेन देशाची एक महिला देखील उपस्थित आढळून आली. तिच्या पासपोर्ट आणि व्हिसा कागदपत्रांची तपासणी केली असता तिच्या व्हिसाची मुदत १२ जून २०२६ रोजी संपुष्टात आल्याचे उघड झाले. भारतात वास्तव्यासाठी आवश्यक व वैध कागदपत्रे सादर करता न आल्याने संबंधित महिलेविरुद्ध इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ च्या कलम २३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या वास्तव्याबाबत आणि कागदपत्रांबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे तसेच दोन्ही विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही धाड यशस्वी केली.
दरम्यान, अंमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा साठा यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा रायगड पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.