रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे, सुरू असलेली टोलवसुली तसेच ताम्हिणी घाटातील वाहतुकीच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करत विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
भेटीदरम्यान खासदार तटकरे यांनी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पळस्पे–इंदापूर मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही खारपाडा येथे टोलवसुली सुरू करण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अपूर्ण रस्त्यावर नागरिकांकडून टोल आकारणी करणे अन्यायकारक असल्याचे सांगत, संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली तात्काळ बंद करण्यात यावी आणि सर्व सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच टोल आकारणी सुरू करावी, अशी ठाम मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली.
यासोबतच राष्ट्रीय महामार्ग ७५३-एफ वरील ताम्हिणी घाटातील पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या भूस्खलन, दरडी कोसळणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरवर्षी या घाटात वाहतूक अनेक तास, तर काहीवेळा अनेक दिवस विस्कळीत होत असल्याने नागरिक, पर्यटक, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ताम्हिणी घाटात बोगदा उभारण्याच्या प्रस्तावाला प्राधान्य देऊन त्याला तातडीने गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
रायगड आणि कोकणाच्या विकासासाठी सुरक्षित व अखंड रस्ते संपर्क अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत तटकरे यांनी महामार्ग प्रकल्पांची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विशेषतः पळस्पे–इंदापूर मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच टोलवसुली सुरू करणे हे नागरिकांच्या हिताचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात रायगड आणि कोकणातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि अखंड करण्यासाठी या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. ताम्हिणी बोगद्यामुळे दरडी कोसळण्याच्या संकटावर कायमस्वरूपी उपाय होण्याबरोबरच रायगड–पुणे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील महामार्ग विकास आणि वाहतूक सुविधांच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अपूर्ण महामार्गावरील टोलवसुली थांबविणे आणि ताम्हिणी बोगदा प्रकल्पाला गती देण्याबाबत केंद्र सरकार कोणता निर्णय घेते, याकडे आता रायगड व कोकणातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.