
उरण | विठ्ठल ममताबादे
राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ मंजूर झाल्याने राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने विविध हिंदू संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. या कायद्यामुळे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनांद्वारे होणाऱ्या धर्मांतरांवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समिती ने राज्य सरकारचे अभिनंदन करत, हा कायदा ‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी, “आता या कायद्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. गेल्या दोन दशकांपासून ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरविरोधात जागृती मोहीम राबवत असल्याचा दावा समितीने केला आहे.
दरम्यान, समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी, या कायद्याचा व्यापक प्रचार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शाळा, ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये जनजागृती मोहिमा राबवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. देशातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे अस्तित्वात असून, महाराष्ट्र हे असे पाऊल उचलणारे आणखी एक राज्य ठरले आहे.
Related