अंबा नदीत ऐतिहासिक पुलावरून महिलेची उडी – कोलाड रेस्क्यू टीमचा शोध सुरू

अंबा नदीवरील ऐतिहासिक पुलावरून आदिवासी महिलेने मारली उडी; शोध मोहीम सुरू
नागोठणे (महेंद्र माने) :
अंबा नदीवर असलेल्या ऐतिहासिक पुलावरून बुधवार 16 जुलै रोजी सकाळी एका महिलेने उडी घेतली असून कोलाड येथील सह्याद्री वनजीव संरक्षण संस्थेच्या रेस्क्यू टीमला पाचरण केले. त्याच्या मार्फत वाहून गेलेल्या महिलेची शोध मोहीम चालू आहे.
शहरा जवळील चिकणी येथील आदिवासी वाडीतील अलका लहू जाधव वय वर्ष 35 ही महिला बुधवार 16 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान ती व तिचा पती अंबा नदीवरील ऐतिहासिक पुलावरून नागोठणेच्या दिशेकडून वरवठणे कडे दारूच्या नशेत जात असताना या महिलेने हातातील पिशवी बाजूला ठेवून अंबा नदीमध्ये उडी घेतली. त्यातच काल मंगळवार 15 जुलै रोजी अंबा नदीला पूर येऊन गेला असल्याने ती दुथळी भरून वाहत आहे. त्या प्रवाहात सदरील महिला वाहून गेली आहे.
सदरील घटनेची माहिती सहा. पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना समजताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन कोलाड येथील सह्याद्री वनजीव संरक्षण संस्थेच्या रेस्क्यू टीमला पाचरण केले. या टीमचे एकूण 13 जण व स्वतः सचिन कुलकर्णी यांनी सकाळी साडे अकराच्या दरम्यान सुमारे एक ते दीड तास शोध मोहीम राबवली परंतु या महिलेचा शोध काही लागला नाही.
या महिलेला शोधण्यासाठी ड्रोन कॅमेरा व अजून दोन छोट्या बोटी मागवण्यात आल्या असून ही महिला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत ही शोध मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती सचिन कुलकर्णी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *