पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात HSRP नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांविरुद्ध २० ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी तातडीने HSRP बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतील निर्देश आणि परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पनवेल RTO मधील वायुवेग पथके आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख रस्ते, महामार्ग, तपासणी नाके तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार HSRP नंबर प्लेट बसविण्यात आली आहे की नाही, याची पडताळणी करण्यात येत आहे.
HSRP बसविणे बंधनकारक असतानाही नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पनवेल, उरण, खालापूर आणि कर्जत या RTO कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनी अद्याप HSRP बसविली नसल्यास दंड टाळण्यासाठी तातडीने नोंदणी करून अधिकृत फिटमेंट सेंटरमध्ये नंबर प्लेट बसवून घ्यावी.
HSRP नंबर प्लेटसाठी वाहनधारकांनी www.mhhsrp.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. पनवेल, खारघर, कळंबोली, उलवे, कर्जत, तळोजा, उरण, जुने पनवेल आणि वडखळ आदी परिसरांत अधिकृत फिटमेंट सेंटर उपलब्ध आहेत.
HSRP नंबर प्लेट बसविणे हे नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाहनधारकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता तातडीने नंबर प्लेट बसवून घ्यावी आणि २० ते ३० नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या विशेष तपासणी मोहिमेत संभाव्य दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.