अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळाच्या पटांगणात पार पडलेल्या जिल्हा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांच्या पदाधिकारी निवड मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्यांची आठवण करून दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात नारायण नागू पाटील यांनी उभारलेल्या चळवळीचा दाखला देत जयंत पाटील यांनी नव्या पिढीला या विचारांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
पाटील म्हणाले की, “एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो हे नारायण नागू पाटलांनी आपल्या लढ्यातून दाखवून दिले. आजही त्यांची शिकवण आणि त्यागाची प्रेरणा आमच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. ही भूमी क्रांतीची आहे, आणि इथून पुन्हा नव्या उमेदीने लढा उभारायचा आहे.” त्यांनी सरकारवरही जोरदार टीका केली. “कामगारांनी रक्त सांडून जे कायदे मिळवले, तेच आजचे सरकार पुसून टाकत आहे. आता वेळ आली आहे की रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारायचा,” असे ते म्हणाले.
मेळाव्यात पक्षाच्या प्रदेश महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी महिलांना आंदोलनात पुढे येण्याचे आवाहन करताना सांगितले, “महिलांनी पदर खोचून कामाला लागा. विजय नेतृत्वाच्या पायाजवळ आणायचा आहे. लाल बावटा पुन्हा दिमाखात डोलायला हवा.”
जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी राज्यातील भ्रष्टाचार, पीकविमा बंदी, आणि लोकप्रतिनिधींच्या गैरकारभारावर रोष व्यक्त करत शेकापच्या नव्या संघर्षाची घोषणा केली. जिल्ह्यात चौथी मुंबई उभारली जात असताना भूमीपुत्रांच्या न्यायासाठी शेकाप खंबीरपणे पाठीशी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यात जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमधून आलेले नवे-जुने पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलांचा आणि तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. कार्यक्रमाच्या शेवटी ठरवण्यात आले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष नव्या ताकदीने मैदानात उतरेल, आणि लाल बावट्याचा विजय निश्चित करेल.