तालुक्यातील सर्वात पहिली सवाद येथील महाबळेश्वर देव ट्रस्ट तर्फे महाबळेश्वर शंकराची त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मंगळवारी दि. २४ नोव्हेंबरला वार्षिक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. या अनुषंगाने रविवारी महाबळेश्वर शंकर मंदिराचा जिर्णोद्धार व कलशारोहण विधी होणार असून सोमवारी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते नवीन मंदिर इमारतीचे उदघाटन आयोजित करण्यात आले आहे.
पोलादपूर तालुक्यातील सवाद गावातील सावित्री नदीच्या काठावर पुरातन काळापासून महाबळेश्वर शंकर मंदिर अस्तित्वात आहे. या मंदिराची जत्रा पोलादपूर तालुक्यातील सर्वात पहिली जत्रा असते. गेल्या काही वर्षांपासून या पुरातन मंदिराच्या जिर्णोद्धाराचा संकल्प करण्यात आल्यानंतर यंदा मंदिराच्या इमारतीचे काम श्रध्दाळूंच्या अनंतहातांनी पुर्णत्वास गेले आहे. त्यामुळे यंदा रविवार, दि. २२ नोव्हेंबर रमेश जंगम गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली पौरोहित्य करीत शिवरुद्राभिषेक, कलश अभिषेक, कलशारोहण, बळीपुजा, पूर्णाहुती, शिवपाठ, हरिपाठ, महाप्रसाद, किर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी कमळ वाहणे, उत्तर पुजा झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो खारजमीन विकास आणि फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते मंदिराच्या नवीन इमारतीचे उदघाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रीडा व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, सवाद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वाय. सी. जाधव, उद्योजक सुभाष निकम, सामाजिक कार्यकर्ते जयराम गायकवाड, राजिप सदस्य डॉ. निलेश कुंभार, दत्तात्रय उतेकर, उद्योजक शामलाल शर्मा, माजी राजिप सदस्य मनोज काळीजकर, माजी पं.स.सभापती रवींद्र फुलसुंदर, सवादच्या सरपंच शर्मिला उतेकर, उपसरपंच शब्बीर तारलेकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश कालेकर, सयाजी मांढरे, उद्योजक तानाजी जाधव, पोलीस पाटील अभिषेक बुडबाडकर, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे व उपतालुकाप्रमुख शौकत तारलेकर, माजी प्राचार्य संजय मेहता व स्थानिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हरिपाठ, त्रिपुर आरती व दीपपूजन, सप्तक्रोशीतील ग्रामस्थांची भजने, श्री महाबळेश्वर शंकराची ग्रामप्रदक्षिणा पालखी मिरवणूक, मंडणगड तालुक्यातील तळेघर येथील शक्तीवाले आणि महाड तालुक्यातील सव येथील तुरेवाले यांच्यात तमाशाचे जंगी सामने असे तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
याप्रसंगी दरवर्षी प्रमाणे हजारो शिवभक्तांनी सवाद येथील मंदिर जिर्णोद्धार, कलशारोहण व उदघाटनासह महायात्रेला उपस्थित राहून महाबळेश्वर शंकराचे मनोभावे दर्शन घेण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाबळेश्वर शंकर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष समीर विन्हेरकर, उपाध्यक्ष प्रकाश विन्हेरकर व विश्वस्त मंडळाने केले आहे.