आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्याला वाव देऊन त्यांना राज्यासह राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे. शिक्षणाबरोबरच उत्तम खेळाडू घडविणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देणे आणि क्रीडा क्षेत्रात त्यांना प्रगतीची संधी मिळवून देणे हा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील आदिवासी खेळाडू कबड्डीसह विविध क्रीडा प्रकारांत राज्यस्तरावर चमकावेत, यासाठी क्रीडा शिक्षक मेहनत घेत आहेत. यापुढे आदिवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पेण प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी केले.
आदिवासी विकास विभाग, पेण प्रकल्पांतर्गत आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन रविवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले. या स्पर्धांमध्ये तब्बल १ हजार ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धांबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सुरेश दोरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष माने, महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर कारोटे, पंचायत समिती सदस्य अक्षय तीतकारे, राष्ट्रीय खेळाडू स्पुर्ती माने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संतोष गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर फसाळे, विस्तार अधिकारी शशिकांत साबळे, सौरभ बोबडे, मुख्याध्यापक रमेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय विविध समित्यांचे अध्यक्ष, क्रीडा, कला व संगणक शिक्षक, आदिवासी संघटनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रकल्पस्तरीय स्पर्धेत यश मिळाले म्हणून हुरळून जाऊ नये आणि अपयश आले म्हणून खचूनही जाऊ नये. यश-अपयशाचा विचार न करता सातत्याने मेहनत, जिद्द आणि चिकाटीने खेळात प्रगती करावी. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच कला शिक्षकांनी रांगोळी व खेळाडूंची आकर्षक चित्रे रेखाटून स्पर्धेचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष माने यांनीही स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या धर्तीवर नव्हे, तर त्याहूनही उत्कृष्ट पद्धतीने प्रकल्पस्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून, योग्य मार्गदर्शन, सराव आणि संधी मिळाल्यास ही मुले आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कामगिरीने नाव कमावू शकतात. पेण प्रकल्पातील क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच, १ हजार ३५० विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पेण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना क्रीडामय वातावरणात सुरुवात झाली असून, या स्पर्धांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.