पनवेल तालुका पोलीस ठाणे व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेश्वर, देहरंग, मोरबे ही धरणे, तसेच वारदोली व कुंडी धबधबा, हरीग्राम, धोदाणी, चिंध्रण, महोदर, शांतीवन, आदई, नेवाळी धबधबा, गाढी नदीपात्र ही पावसाळी पर्यटनस्थळे आता पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत.
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) रश्मी नांदेडकर यांनी विशेष आदेश जारी करत पावसाळी काळात या सर्व ठिकाणी नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.
दर शनिवार व रविवार या ठिकाणी 300 ते 5000 पर्यटक भेट देतात. त्यामध्ये अनेकजण मद्यधुंद अवस्थेत धरणांतील किंवा नदीपात्रातील पाण्यात उतरतात. पाण्याचा अंदाज न लागल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. गेल्या काही वर्षांत अशा घटना घडल्याने पोलिसांनी यंदाही कडक निर्णय घेतला आहे.
हा बंदोबस्त स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
———————————————
पर्यटकांनी वर्षा सहलीसाठी पोलीस खात्यामार्फत जाहीर केलेल्या ठिकाणी येवू नये व आपला मौलिक जीव वाचवावा. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या फलकांवरील सुचनांचे पर्यटकांनी पालन करावे.