देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात न्यायालयाने १४ आरोपींविरोधात औपचारिक आरोप निश्चित केले आहेत. सर्व आरोपींनी आरोप मान्य करण्यास नकार दिल्याने आता २५ नोव्हेंबरपासून खटल्याला सुरुवात होणार आहे. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि लातूरपर्यंत पोहोचले असून, प्रसिद्ध कोचिंग क्लासेसच्या संचालकांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान सीबीआयने १४ आरोपींना अटक केली. या प्रकरणात फसवणूक, विश्वासघात, भ्रष्टाचार आणि परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित आरोपांचा समावेश आहे. तसेच, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीशी (NTA) तज्ज्ञ म्हणून संबंधित असलेल्या मनीषा गुरुनाथ मांढरे, पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा संजय हवालदार यांच्याविरोधात सार्वजनिक सेवक म्हणून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही आरोप निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता न्यायालयातील सुनावणीदरम्यान कोणते मुद्दे समोर येतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. पेपरफुटीच्या आरोपांनंतर ३ मे रोजीची परीक्षा रद्द करून २० जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आल्याचे दिलेल्या वृत्तात नमूद आहे. या प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती.
दरम्यान, लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आणि रसायनशास्त्राचे शिक्षक शिवराज मोटेगावकर यांचा मुलगा आदित्य मोटेगावकर याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आदित्यची नीट-यूजी २०२६ परीक्षेतील उमेदवारी कथित गैरप्रकारांच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने एनटीएला अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आता आदित्यवर दोन वर्षांसाठी नीट परीक्षेत बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आहे. या कारवाईमुळे लातूरमधील शैक्षणिक क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे.