तीव्र रक्तक्षयग्रस्त गर्भवती मातांसाठी मोफत उपचारांना गती; राज्यात ९१ टक्के उपचार पूर्ण

मुंबई | विशेष प्रतिनिधी 
गर्भावस्थेत रक्तक्षयामुळे माता आणि नवजात शिशूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तीव्र रक्तक्षयग्रस्त गर्भवती मातांना आयर्न सुक्रोज आणि फेरीक कार्बोक्सी माल्टोज (FCM) या औषधांद्वारे शिरेवाटे मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
एचएमआयएसच्या २०२६-२७ मधील जुलैअखेरच्या आकडेवारीनुसार, तपासणीत २३,५२४ गर्भवती मातांमध्ये तीव्र रक्तक्षय आढळून आला. त्यापैकी २१,३३७ मातांना उपचार देण्यात आले असून उपचाराचे प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
‘Four T Strategy’वर भर
रक्तक्षयाचे वेळेत निदान आणि उपचारासाठी Test, Talk, Treat आणि Track या Four T Strategy अंतर्गत नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गर्भधारणेची नोंद होताच हिमोग्लोबिन तपासणी, आयर्न-फॉलिक अॅसिड सेवनाबाबत समुपदेशन, लोहयुक्त आहाराची माहिती आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा दिली जात आहे.
२०१८-१९ पासून शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोजद्वारे उपचार दिले जात आहेत. तर २०२४-२५ पासून आयर्न सुक्रोजसोबत फेरीक कार्बोक्सी माल्टोजही उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपचारांचा सुरक्षित आणि प्रभावी वापर व्हावा यासाठी जानेवारी २०२६ मध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले.
अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांत तीव्र रक्तक्षयग्रस्त मातांना १०० टक्के उपचार देण्यात आले आहेत. नागपूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, हिंगोली, जालना, धाराशिव आणि ठाणे यांसह अनेक जिल्ह्यांनी ९५ ते १०० टक्के उपचार कव्हरेज साध्य केले आहे.
उपचारांचे प्रमाण कमी असलेल्या नंदुरबार, सोलापूर, गडचिरोली, पालघर, नाशिक आणि भंडारा जिल्ह्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. आशा सेविका, आरोग्यसेविका, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत पात्र मातांपर्यंत उपचार पोहोचविण्यावर भर दिला जात आहे.
आयर्न सुक्रोज आणि FCM उपचारांमुळे हिमोग्लोबिन व शरीरातील लोहाचा साठा वाढण्यास मदत होते. मात्र, गर्भवती महिलांना ही इंजेक्शने केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच देणे आवश्यक आहे. योग्य वेळी निदान, उपचार आणि पुनर्तपासणीमुळे सुरक्षित मातृत्वाला अधिक बळ मिळण्यास मदत होत आहे.