ताम्हिणी घाटात भीषण अपघात : थार ५०० फूट दरीत कोसळून 6 तरुणांचा मृत्यू

Four killed as Thar falls into 500-foot gorge
महाड | मिलिंद माने
माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात महिंद्रा कंपनीची थार जीप ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. पुण्याहून माणगावकडे येत असताना वाहनाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी पोहोचताच माणगाव पोलीस निरीक्षक जयसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीम उतरली आणि अत्यंत कठीण परिस्थितीत दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. ताम्हिणी घाट हा तीव्र वळणांमुळे धोकादायक मानला जातो. पूर्वीही या घाटात अनेक गंभीर अपघात घडले असून हा मार्ग अत्यंत गर्दीचा आहे. ड्रोन शुटमध्ये दरीत थार जिप दिसताच बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र अपघात नेमका केव्हा झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.
मृत तरुणांची नावे पुढीलप्रमाणे :
1)प्रथम शहाजी चव्हाण (वय 22) – चालक, रा. भैरवनाथ नगर, पुणे
२) पुनीत सुधाकर शेट्टी (वय 20) – रा. उत्तमनगर, पुणे
३) साहिल साधू बोटे (वय 24) – रा. उत्तमनगर, पुणे
४) महादेव कोळी (वय 18) – रा. भैरवनाथ नगर, पुणे
५) ओमकार सुनील कोळी (वय 18) – रा. भैरवनाथ नगर, पुणे
६) शिवा अरुण माने (वय 19) – रा. भैरवनाथ नगर, पुणे
सर्वजण कोंडवे धावडे, भैरवनाथ नगर, पुणे येथील असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात कोसळलेली जीप क्रमांक MH-12 YN 8004 आहे. या तरुणांबाबत १५ नोव्हेंबर सायंकाळी पुण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतरच या अपघाताविषयीची प्राथमिक माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *