ताम्हिणी घाटात भीषण अपघात : सनरुफ कारवर दरड कोसळून महिलेचा मृत्यू ! नेमकं जबाबदार कोण ?

सनरुफ कारवर दरड कोसळून महिलेचा मृत्यू
रायगड | अमुलकुमार जैन
पुणे-माणगांव मार्गावरील ताम्हिणी घाटात गुरुवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. सनरुफ असलेल्या आलिशान कारवर अचानक दरड कोसळल्याने स्नेहल गुजराती (वय ४३) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका अचानक झाला की प्रवाशांना काहीच सावरता आले नाही. दरडीतील मोठे दगड थेट कारच्या सनरुफवर आदळले आणि एक दगड आत येऊन महिलेच्या डोक्यावर आपटला.
अपघातानंतर स्नेहल गुजराती यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांनी उपचारादरम्यानच प्राण सोडले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरवर्षी ताम्हिणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्या तरी, प्रशासनाकडून अद्याप ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत, अशी प्रवाशांची नाराजी व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेने एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे , “घाटरस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी नेमके कोण जबाबदार?” स्नेहल गुजराती यांच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ताम्हिणी घाटातील प्रवास ‘मृत्यूचा प्रवास’ ठरू नये, यासाठी प्रशासनाने तत्काळ दरड प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *