
उरण (विठ्ठल ममताबादे ) :
भारतातील विविध परंपरा व रीतीरिवाजांमध्ये लग्न ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. पारंपरिक रीतीने छापील लग्नपत्रिका वाटण्याची पद्धत आता हळूहळू मागे पडत चालली आहे. याला कारण ठरत आहे – डिजिटल युगाची वेगवान वाटचाल.
पूर्वी नातेवाईकांच्या घरी जाऊन, दारात अक्षता ठेवून लग्नपत्रिका देण्याची पद्धत होती. या निमित्ताने नातेसंबंध बळकट होत असत. मात्र आता मोबाईल व इंटरनेट क्रांतीमुळे ही परंपरा बदलत आहे. छापील पत्रिकेच्या जागी ऑनलाईन डिजिटल निमंत्रणांनी जागा घेतली असून, लग्नाचे आमंत्रण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दिले जात आहे.
विशेषतः व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा प्लॅटफॉर्म्सवरून डिजिटल लग्नपत्रिका शेअर केल्या जात आहेत. अनेक तरुण मंडळी यामध्ये उत्साहाने सहभागी होत असून, ‘प्री वेडिंग शूट’ सोबतच ‘व्हिज्युअल इन्व्हिटेशन’चा नवा ट्रेंड पाहायला मिळतोय.
एका नवविवाहित व्यक्तीने सांगितले, “माझ्या लग्नाला व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रण दिल्यामुळे प्रचंड वेळ वाचला आणि सर्वांनी हजेरी लावली. खर्चही कमी झाला. याला नातेवाईकांसह मित्रमंडळींचा उत्तम प्रतिसाद मिळाला.”
मोबाईल क्रांतीमुळे आता शेकडो पत्रिका छापण्याची गरज राहत नाही. गरजेपुरत्या ५०-१०० पत्रिका छापून उरलेले निमंत्रण डिजिटल स्वरूपात दिले जाते. यामुळे वेळ, श्रम आणि पैशांची बचत होत आहे. शिवाय ऑनलाइन निमंत्रणात हव्या त्या प्रकारचे बदल करता येतात, त्यामुळे हे अधिक सोयीचे ठरते.
आजच्या तंत्रज्ञान प्रधान युगात डिजिटल निमंत्रण ही नवी संकल्पना अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. बदलत्या काळाला स्वीकारत नागरिकांनीही हे नवे तंत्र अंगीकारले आहे, त्यामुळे पारंपरिक पत्रिकांची गरज आता हळूहळू कमी होत चालली आहे.
Related