टोरंटच्या वृक्षतोडीविरोधात पत्रकारही मैदानात; कर्जत प्रेस क्लबचे प्रशासनाला निवेदन!

कर्जत | गणेश पवार
कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आता पत्रकारांनीही आवाज उठवला आहे. कर्जत प्रेस क्लब आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने या वृक्षतोडीचा तीव्र निषेध नोंदवत वृक्षतोड तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन त्याच दिवशी कंपनी आणि शासनाकडे पाठविण्याची विनंतीही पत्रकारांनी केली.
कर्जत तालुक्यातील पाली-साई डोंगर 1 परिसरात टोरंट पॉवर कंपनीकडून प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ३ हजार मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी ३७७ हेक्टर (सुमारे ७०० ते ८५० एकर) जमीन संपादित केली जाणार आहे, ज्यामध्ये वनविभागाची (फॉरेस्ट) जमीन आणि काही खाजगी जमिनीचा समावेश आहे.या मेगा प्रकल्पासाठी अंदाजे १३,५०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
त्यासाठी भीमाशंकरच्या जंगल परिसरातील वृक्षतोड करण्यात आली असून आता पर्यंत तीन हजार झाडांची कत्तल करण्यात आली असून अडीच लाख झाडे तोडण्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या जंगलावर, जैवविविधतेवर, वन्यजीवांच्या अधिवासावर आणि स्थानिक पर्यावरणावर परिणाम होण्याची चिंता पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रकल्पाला विरोध करत गेल्या काही दिवसांपासून विविध संघटना आणि पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरू झाले असून राजकीय नेत्यांनीही याठिकाणी भेट दिलेली आहे.
दरम्यान प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात साई डोंगर परिसरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे नैसर्गिक वनसंपदा, जैवविविधता, पर्यावरणीय समतोल आणि स्थानिक निसर्गसंपत्तीला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याची समृद्ध वनसंपदा आणि कर्जत तालुक्यातील साई डोंगराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता हा प्रश्न केवळ स्थानिक न राहता व्यापक पर्यावरणीय चिंतेचा विषय असल्याचे पत्रकारांनी नमूद केले.
विकासकामांना विरोध नसून विकासाच्या नावाखाली नैसर्गिक वनसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये, अशी भूमिका पत्रकारांनी मांडली. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक नागरिकांचे हित आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन यांना प्राधान्य मिळाले पाहिजे, असेही निवेदनात म्हटले आहे.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे ही पत्रकारांची सामाजिक जबाबदारी आहे. याच भूमिकेतून कर्जत प्रेस क्लब आणि पत्रकार परिषदेने वृक्षतोडीविरोधात पुढाकार घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते, सचिव दर्वेश पालकर, अध्यक्ष गणेश पवार, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, संजय गायकवाड, विद्यानंद ओव्हाळ, संतोष दळवी, जयवंत हाबळे, दीपक पाटील,मल्हार पवार, मोतीराम पादिर, अनिल गवळे, संजय अभंगे, गणेश पुरवंत, विलास श्रीखंडे, ज्ञानेश्वर बागडे आदी पत्रकार उपस्थित होते.