कोलाडमध्ये एमआयडीसीच्या कामावर टोळक्याचा राडा! खंडणीसाठी कामगारांना बेदम मारहाण; हातपाय तोडण्याची धमकी, गुन्हा दाखल

Workers brutally beaten for extortion in Kolad

कोलाड | श्याम लोखंडे 

रोहा तालुक्यातील पहूर व जाधववाडी परिसरातील नियोजित एमआयडीसीच्या विकासकामाच्या ठिकाणी बेकायदेशीर टोळके जमवून कामगारांना मारहाण करत खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “आम्हाला कामावर ठेवा, नाहीतर पैसे द्या” अशी दमदाटी करत एका टोळक्याने कामावर असलेल्या कामगारांवर काठीने हल्ला चढवून त्यांना गंभीर दुखापत केली असून, पुन्हा काम सुरू केल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​ मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील रहिवासी असलेले व सध्या कोलाड रेल्वे स्टेशन समोरील आंचीत कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास असलेले फिर्यादी हे आपल्या सहकाऱ्यांसह रोहा तालुक्यातील पहूर आणि जाधववाडी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या नियोजित एमआयडीसीच्या रस्ते विकासाचे काम पोकलेन व हायवा डंपरच्या साहाय्याने करत होते. काम सुरळीत सुरू असतानाच, एका संशयिताने इतर दोन मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून आपल्या ५ ते ६ साथीदारांसह घटनास्थळी बेकायदेशीर गर्दी जमवली. त्यानंतर या टोळक्याने फिर्यादी व उपस्थित कामगारांना अडवून, “येथील एमआयडीसीच्या कामामध्ये आम्हाला काम द्या किंवा आम्हाला पैसे द्या” अशी जबरदस्तीने पैशांची मागणी केली.
​फिर्यादींनी यास असमर्थता दर्शवताच संशयित आरोपीने हातातील काठीने फिर्यादी व साक्षीदारांवर बेदम हल्ला चढवत त्यांना जबर मारहाण करून दुखापत केली. एवढ्यावरच न थांबता, “जर पुन्हा काम सुरू केले तर तुमचे हातपाय तोडून टाकीन,” असा थेट इशारा दिला. यावेळी जमलेल्या इतर ५ ते ६ साथीदारांनीही अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत फिर्यादी व साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी दिली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कामाच्या ठिकाणी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
​या घटनेनंतर पीडितांनी तत्काळ कोलाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी तक्रारीची दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३०८(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. औद्योगिक विकासकामांना अशा प्रकारे खंडणी उकळण्यासाठी अडथळा निर्माण करून दहशत माजवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महाडिक करित आहेत.