कोतवाल या गावात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायत कोतवाल बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांनी ८ तास श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. मात्र, या बंधाऱ्याला ‘नामदार प्रवीणभाऊ दरेकर जलक्रांती वनराई बंधारा’ असे नामकरण करून रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री वनराई बंधारा योजनेपेक्षा वेगळेपणा जोपासला.
कोतवाल बुद्रुक गावातील भुमिपुत्र विधानपरिषदेतील भाजपा गटनेते प्रवीणभाऊ दरेकर यांच्या प्रेरणेतून आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेल्या या जलसंधारण उपक्रमाद्वारे गावाच्या भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कायम राहावी, या उद्देशाने गावातील नदीवर हा वनराई बंधारा बांधण्यात आला. यासाठी गावातील ग्रामस्थांनी दिवसभर सलग आठ तास उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. तब्बल ८० फूट लांब आणि ६ फूट रुंद बंधारा ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांतून साकार झाला. यासोबतच गावातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचे दर्शन घडून आले. गप्पा, गोष्टी, विविध विषयांवरील चर्चा, हसत-खेळत काम, एकत्रित भोजन अशा आनंददायी वातावरणात बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
या श्रमदान उपक्रमात कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ, सरपंच रेखा दळवी, उपसरपंच राजेश कदम, पोलीस पाटील श्रीधर जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सोनवलकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्य ग्रामस्थ, संस्थेचे पदाधिकारी, महिला भगिनी तसेच लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.