कल्पवृक्षाखाली सुरू असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी केला उद्ध्वस्त

Aakshee jugar
अलिबाग | अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील मौजे साखर बंदर आक्षी येथे गावाचा ‘कल्पवृक्ष’ मानल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडाखाली सुरू असलेला जुगाराचा अड्डा अलिबाग पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. झोपडीच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी पाच रुपये पॉइंटने रम्मी नावाचा जुगार खेळत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मासेमारी व्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या शांत गावात अशा प्रकारचा जुगार सुरू असल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दिनांक ३० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली. साखर बंदर आक्षी येथील एका वाडीत सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती अलिबाग पोलिस ठाण्याला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला. छाप्यादरम्यान कल्पवृक्ष ठरलेल्या नारळाच्या झाडाच्या आडोशाला झोपडीजवळ सहा जण पत्त्यांचा खेळ खेळताना आढळून आले.
या कारवाईत रविंद्र गोपिनाथ सारंग (वय ४५, व्यवसाय मासेमारी), वासुदेव दामोदर बुरांडे (वय ६७, व्यवसाय मासेमारी), विश्वनाथ जयराम वाटकर (वय ६७, व्यवसाय मासेमारी), सागर मोतीराम वाटकर (वय ४८, व्यवसाय मासेमारी), देविदास गणपत वाघमारे (वय ५५, व्यवसाय मासेमारी) हे सर्व राहणार साखर आक्षी, तसेच रमेश जर्नादन सुर्वे (वय ७२, व्यवसाय खानावळ, रा. शितोळे आळी, अलिबाग) अशा सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.
तपासात हे सर्व आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाच रुपये पॉइंटने रम्मी जुगार खेळत व खेळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला हा जुगार परिसरातील सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार परेश मुरलीधर म्हात्रे (वय ३५) यांनी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. आरोपींविरोधात बीएनएसएस २०२३ चे कलम ३५(३) अन्वये कारवाई करण्यात आली असून, सर्व आरोपींना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गावकऱ्यांसाठी पूजनीय आणि उपजीविकेचे प्रतीक असलेल्या नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ मानले जाते. अशा झाडाच्या आडोशाला जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे हा गुन्हा असून, भविष्यात अशा प्रकारांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचा इशारा अलिबाग पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *