कर्जत शहरातील चार फाटा येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण ट्रक अपघात झाला. पनवेलहून मुरबाडकडे कोटा लादी घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक KA-56-4575) अचानक ब्रेक फेल झाल्याने कर्जत चार फाटा येथे रेल्वे पुलालगत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट स्तंभाच्या कामाला जोरदार धडकला. अपघातात ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चेपला गेला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.
ट्रक चालक सुनिल विश्वनाथ मळे (वय अंदाजे ४५, रा. सस्तापुर, कर्नाटक) हा केबिनमध्ये अडकून पडला होता. तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेल्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले व उपचारासाठी डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे एका दुचाकीस्वार आणि टेम्पो यांना धडक होणे टळले आणि मोठी जीवितहानी टळली. त्यामुळे नागरिकांनी चालकाचे कौतुक केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड व त्यांचे सहकारी, अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ठिकाणची पाहणी करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे घडलेली घटना तपासली जात आहे. कर्जत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.