कर्जतमधील प्रस्तावित टोरंट प्रकल्पाला मनसेचा विरोध; आंदोलनाचा इशारा

कर्जत गणेश पवार
कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट प्रकल्पाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांवर परिणाम करणारा विकास मान्य केला जाणार नाही, असा इशारा मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष अभिजीत घरत यांनी दिला आहे.
मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष अभिजीत घरत, उपजिल्हा सचिव शैलेश सुर्वे आणि कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भवारे,पाथराज जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष प्रशांत हुलावले, कशेळे पंचायत समिती विभाग अध्यक्ष कैलास हाबळे यांनी ग्रामस्थांसह साईडोंगर भागातील मोहमालवाडी परिसराची पाहणी केली.
याच ठिकाणी टोरंट प्रकल्पातील धरणाचे काम प्रस्तावित असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. प्रकल्पासाठी शासनाला जागेसंदर्भात खोटी माहिती सादर केल्याचा दावा करत, जमीन, जंगल, वन्यजीव आणि पाणीस्रोतांवर परिणाम होण्याची भीती मनसेने व्यक्त केली आहे.
प्रकल्पाचे काम सुरू केल्यास किंवा अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी आल्यास ‘मनसे स्टाईलने उत्तर देऊ’, असा इशाराही अभिजीत घरत यांनी दिला आहे.