कंपनीच्या छतावरून पडून कामगाराचा जागीच मृत्यू !

महाड | प्रतिनिधी 
महाड औद्योगिक परिसरातील रिलायबल केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीच्या छताच्या दुरुस्तीची पाहणी करताना एका कामगाराचा छतावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ७ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यापूर्वी कंपनीच्या छताची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी जितेंद्र तेजबहादुर गौतम (वय २८, रा. बेला, उत्तर प्रदेश) आणि श्रवण कुमार राजाराम यादव (वय ४१, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे छताची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी श्रवण कुमार यादव कंपनीच्या छतावर चढला असता अचानक पत्रा तुटून तो खाली कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कंपनीच्या छतावर काम करताना आवश्यक सुरक्षा साधने किंवा इतर खबरदारी घेण्यात आली होती की नाही, याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, मृत कामगार हा कंपनीचा कर्मचारी नसला तरी त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे कंपनीचे मालक लायनल परेरा यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पी. एस. पवार करीत आहेत.