आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी ‘महिमा’ संस्थेस मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातील सर्वसामान्य जनतेला मंत्रालय प्रवेश ठरणार अडचणीचा; १५ ऑगस्ट पासून नवी नियमावली
मुंबई | विशेष प्रतिनिधी 
जगभरातील विविध देशांमधील रोजगाराच्या संधींसाठी समन्वय व प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (Maharashtra Agency for Holistic International Mobility & Advancements – MAHIMA) स्थापन व कार्यान्वित करण्यास शनिवार दि. 17 रोजी  झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना विविध देशांतील रोजगार संधी, आवश्यक कौशल्ये व उपलब्ध संधींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
भारताच्या लोकसंख्येमध्ये १८ ते ४५ वयोगटातील कार्यप्रवण गटाचे प्रमाण सुमारे ६० ते ६५ टक्के आहे. या मोठ्या मनुष्यबळाला योग्य रोजगार संधी उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागासह इतर विभागांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य प्रशिक्षित मनुष्यबळ देश-विदेशातील औद्योगिक संस्थांना पुरविण्यात अग्रेसर ठरले आहे.
राज्यात सार्वजनिक व खासगी क्षेत्रामध्ये मिळून एक हजारहून अधिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे जाळे असून, कृषि, उद्योग, बांधकाम, आरोग्य, आतिथ्य, लॉजिस्टिक्स, बँकिंग व सेवा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल कामगार तयार होत आहेत. विकसित देशांमधील अधिक वेतनाच्या संधींमुळे आंतरराष्ट्रीय रोजगाराकडे तरुणांचा कल वाढत असून, केरळ, तेलंगणा व आंध्रप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रानेही ‘महिमा’ या एकछत्री संस्थेच्या माध्यमातून परदेशी रोजगारासाठी प्रभावी पाऊल उचलले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *