पेणमधील ५० वर्षीय रिक्षाचालकावर नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार; ३० मिनिटांच्या आव्हानात्मक एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे टूथब्रश बाहेर काढण्यात यश
दात घासताना चुकून टूथब्रश गिळल्याने ५० वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. तपासणीत संपूर्ण टूथब्रश पोटात अडकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे कोणतीही शस्त्रक्रिया न करता तो बाहेर काढला. या उपचारानंतर काही तासांतच रुग्णाला घरी सोडण्यात आले.
पेण येथील राहणारे आणि शारीरीकरित्या विकलांग रिक्षाचालक ‘राजेंद्र मालुसरे’ हे नेहमीप्रमाणे सकाळी दात घासत असताना चुकून त्यांच्या तोंडातून टूथब्रश पोटात गेला. यानंतर त्यांनी सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला; मात्र त्यामध्ये तो दिसून आला नाही. त्यामुळे पुढील तपासणीसाठी त्यांना नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. येथे एन्डोस्कोपी केल्यानंतर संपूर्ण टूथब्रश त्यांच्या पोटात अडकल्याचे दिसून आले.
मेडिकव्हर हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एन्डोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील टिमने ही आव्हानात्मक प्रक्रिया यशस्वी पार पाडली.
याबाबत माहिती देताना डॉ. रावसाहेब राठोड म्हणाले, टूथब्रश गिळल्यानंतर साधारण तीन ते चार तासांनी रुग्ण पोटात सौम्य वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल झाला. एंडोस्कोपी तपासणीत १९ सेमी लांबीचा टूथब्रश पोटात असल्याचे आढळले. टूथब्रश ही लांब आणि कठीण वस्तू असल्याने पचनमार्गातून बाहेर काढणे आव्हानात्मक असते. त्यामुळे अन्ननलिकेत किंवा पचनमार्गातील अरुंद भागांमध्ये तो अडकण्याची तसेच अंतर्गत जखम होण्याची शक्यता असते. वेळीच उपचार न मिळाल्यास पचनमार्गात अडथळा निर्माण होणे किंवा आतड्याला छिद्र पडण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात.
ते पुढे म्हणाले, सुमारे ३० मिनिटे चाललेल्या एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे टूथब्रश बाहेर काढण्यात आला. टूथब्रश पोटात आडव्या स्थितीत असल्याने तो पकडणे आणि अन्ननलिकेच्या नैसर्गिक वळणांमधून त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढणे आव्हानात्मक होते. एंडोस्कोपच्या टोकाला विशेष हूड लावून टूथब्रशचे एक टोक पकडण्यात आले. मात्र, पोट आणि अन्ननलिका जिथे जोडली जाते, त्या ठिकाणी तो अडकला. रुग्णाच्या शरीराची स्थिती बदलून आणि वारंवार प्रयत्न करून तो पुढे सरकवण्यात आला. त्यानंतर घशातील अरुंद भागातही तो अडकला. टूथब्रश वाकत नसल्याने अत्यंत सावधगिरीने ही प्रक्रिया करावी लागली. अखेर कोणतीही शस्त्रक्रिया न करता संपूर्ण टूथब्रश तोंडावाटे बाहेर काढण्यात आम्हाला यश आले.
टूथब्रश बाहेर काढल्यानंतर पुन्हा एंडोस्कोपी करून अन्ननलिकेच्या वरच्या आणि खालच्या स्नायूंना कोणतीही दुखापत झाली नाही याची खात्री करण्यात आली. त्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. काही काळ निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर प्रक्रियेच्या तीन ते चार तासांतच रुग्णाला स्थिर प्रकृतीत घरी सोडण्यात आले.
डॉक्टरांनी सांगितले की, चुकून टूथब्रश किंवा अन्य मोठी वस्तू गिळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. उलटी करण्याचा प्रयत्न करणे किंवा अन्नाच्या मदतीने वस्तू खाली ढकलणे टाळावे. अशा प्रयत्नांमुळे घसा किंवा अन्ननलिकेला दुखापत होणे, रक्तस्राव होणे किंवा वस्तू अधिक घट्टपणे अडकण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार महत्त्वाचे ठरतात.
उपचारांनंतर राजेंद्र मालुसरे म्हणाले, मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टिमचे मी आभार मानतो. वेळीच उपचार मिळाल्यामुळे कोणतीही शस्त्रक्रिया न करता टूथब्रश बाहेर काढण्यात आला. काही तासांतच सुरक्षितपणे घरी देखील परतलो.
महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले, या प्रकरणातून गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीत अचूक निदान आणि योग्य उपचार किती महत्त्वाचे असतात, हे अधोरेखित होते. रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य वैद्यकीय निर्णय घेणे गरजेचे आहे.
मेडिकव्हर हॉस्पिटल, नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी यांनी सांगितले की, कुशल तज्ज्ञांची टिम आणि आधुनिक उपचारपद्धतींच्या मदतीने दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर रुग्णालयाचा भर आहे.