प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पत्रकारिता ही नेहमीच आपला देश, समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक चौथा स्तंभ राहिला आहे. वर्तमानपत्र, इतरत्र एखादी सूचना, एखादी बातमी येत असते. ती बातमी आपण कशा पद्धतीने घेतो, हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. बातमी सुचनात्मक पद्धतीने घ्यायला हवी. पत्रकारिता आणि राजकारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. मतांचे स्वातंत्र्य हे सगळ्यांना निश्चितपणे आहे असे महत्त्वपूर्ण भाष्य करत यापुढे आपण एकत्रितपणे काम करण्याचा दृष्टिकोन ठेवू या असे मौलिक विचार महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले. त्या रोहा प्रेस क्लब आयोजित प्रेस क्लब सन्मान २०२४ कार्यक्रमात बोलत होत्या.
रोहा प्रेस क्लब आयोजित ज्येष्ठ नागरिक सभागृहात ऋषितुल्य उद्योगपती मुकुंदभाई तुराकीया यांसह शिक्षण, उद्योजक, वैद्यकीय कामगार, स्वच्छ व सुरक्षित कंपनी गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अ भा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर होते. व्यासपीठावर उद्योगपती मुकुंदभाई तुराकीया, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, सलाम रायगडचे संपादक राजेंद्र जाधव रायगड प्रेस क्लबचे सरचिटणीस शशिकांत मोरे उपस्थित होते.
प्रास्ताविकात राजेंद्र जाधव यांनी हा सन्मान सोहळा रोह्याच्या पत्रकारिता इतिहासात नोंद करावा असाच आहे. आदितीताईंनी आपल्या कामातून प्रत्येकाच्या मनात स्थान मिळविले. धाडसी व संयमी राजकारणी म्हणून उल्लेख करावा लागेल. मिलिंद अष्टीवकर यांची परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड हा रोह्याचा बहुमान आहे तर मालक कसा असावा, सामाजिक भान काय असते ? याचे उत्तम उदाहरण ऋषितुल्य मुकुंदभाई आहेत अशा तीन घटकांचा उल्लेख करत करत हम साथ साथ है असेच काम करत राहू अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी रायगड प्रेस क्लब रोहा प्रेस क्लबच्या सहकाऱ्यांमुळेच आपण परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झालो. सर्वच ठिकाणी काम करत असताना परिषदेवर काम करणे हा रोह्यासाठीचा बहुमान मानतो. जिल्ह्यात सक्रीय असलेल्या तालुक्यात रोहा तालुका प्रेस क्लब अग्रगण्य आहे. रोहा प्रेस क्लबने बळ दिले. म्हणून तिथपर्यंत पोहचलो असे कौतूक अष्टीवकर यांनी केले. ना अदिती तटकरे यांचे काम खूपच उल्लेखनीय आहे. रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक, पर्यावरण विषयक कार्याचा खरंच कौतूक आहे अशी भावना अष्टीवकर यांनी व्यक्त केली.
अदिती तटकरे यांनी भाषणात विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. पुरस्कारासाठी विविध मान्यवरांची योग्य निवड केली. त्यात मुकुंदभाईसारखे व्यक्तिमत्व आदरणीय आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीची एमआयडीसीची स्थापना झाली. सर्वच स्थानिकांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो असे सांगत तटकरे यांनी मुकुंदभाईंच्या प्रवासाचे खुमासदार वर्णन केले. देवानंतर श्रद्धास्थान असलेल्या डॉक्टरांच्या कार्याचा उल्लेख करत कामगार शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्त्वाचा गौरव तटकरे यांनी केला. पत्रकारांनी केलेल्या जागाबद्दलच्या मागणीचा आपण सकारात्मक विचार करणार आहोत. त्यासंदर्भातील योग्य ती पावले उचलली जातील असे तटकरे यांनी पत्रकारांना आश्वासित केले. तर जीवनात जे साध्य केले, त्याचे आज सार्थक झाल्याची भावना आहे. कर्मभूमितील पत्रकारांनी केलेला सन्मान कधीच विसरू शकत नाही. माझ्या कामातून, कार्यातून उतराई केले जाईल अशी भावुकता उद्योगपती मुकुंदभाई तुराकीया यांनी मनोगतात व्यक्त करत रोहा प्रेस क्लबच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रमात ना आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उद्योग महर्षी पुरस्कार मुकुंदभाई तुराकीया, देवदूत पुरस्कार डॉ फरीद चिमावकर, डॉ महेंद्र म्हात्रे, डॉ अनिल यादव, डॉ भूषण खरिवले, युवा उद्योजक पुरस्कार रामचंद्र नाकती, आदर्श शिक्षण सेवा पुरस्कार गजनफर कलाब, रवींद्र लोखंडे, आदर्श कामगार पुरस्कार संजय वाढवळ, प्रगती कर्णेकर, स्वच्छ व सुरक्षित कंपनी पुरस्कार नेचुरेक्स प्रा लि धाटाव यांना रोहा प्रेस क्लब सन्मान २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन संदीप सरफळे, आभार प्रदर्शन रवींद्र कान्हेकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नाना खरीवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस क्लबच्या पदाधिकारी, सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यानंतर स्पंदन निर्मित स्वरसंध्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.