Roha: धाटाव एमआयडीसीतील ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीच्या भंगार गोदामाला भीषण आग

Roha : धाटाव एमआयडीसीतील ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीच्या भंगार गोदामाला भीषण आग
कोलाड (श्याम लोखंडे) : 
रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी परिसरात मंगळवारी दुपारी ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीच्या भंगार गोदामाला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे समजताच कामगार, शेजारील गावकरी व नागरिकांमध्ये घबराट पसरली. आगीचे रौद्ररूप प्रचंड काळ्या धुरासह दिसत होते. प्राथमिक माहितीनुसार, स्पार्किंगमुळे आग लागली असून गोदामात प्लास्टिक व टाकाऊ रसायने असल्याने धुराचे लोट प्रचंड होते.
या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ टळल्याचे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कामगारांनी वेळेवर खबरदारी घेतल्यामुळे जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. मात्र, मागील वर्षभरात दोन कामगारांचे बळी जाणाऱ्या ट्रान्सवर्ड कंपनीत अपघातांची मालिका सुरूच आहे.
दरम्यान, या घटनेच्या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे धाटावजवळील कार्यक्रमात उपस्थित होते. अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर ट्रान्सवर्ड कंपनीतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर कारखाना निरीक्षक प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वारंवार अपघातांनी ‘डेंजर झोन’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या कंपनीविरोधात आता कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading