महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजनेंतर्गत २० हजार ४८९ घरकुलांचे भूमिपूजन ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीमार्फत वाडगांव आदिवासी वाडी येथे पंतप्रधान जनजाती आदिवासी न्यास अभियान मार्फत पी.एम. जन मन योजने अंतर्गत १९ घरकुलांचे भूमिपूजन कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना किशन जावळे व डॉ. भरत बास्टेवाड यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहूल पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, वाडगांव ग्रामपंचायत सरपंच सारिका पवार, उपसरपंच जयेंद्र भगत उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनेंतर्गत घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. शनिवारी महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी या घरकुलांचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीच्या माध्यमातून वाडगांव आदिवासी वाडी येथे १९ घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
——————————————–
वाडगांव हे स्वच्छ व सुंदर गाव आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १०० टक्के कर वसुली करणारी वाडगांव ग्रामपंचायत आहे. गावातील उर्वरित घरकुलांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. गावात कुणी निरक्षर लोक असतील तर त्यांच्यासाठी वर्ग सुरू करून वाडगांव १०० टक्के साक्षर करू या. तसेच गावातील लोकांना सर्व योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने काम करुन, येथील आदिवासी वाडीचा सर्वांगीण विकास करण्यात येईल.
…. किशन जावळे जिल्हाधिकारी, रायगड
——————————————–
केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येत आहे. महिलांच्या हस्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांचे भूमिपूजन करण्याचा हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम ठरेल. सर्व घरकुलांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच वाडगांव आदिवासी वाडीवरील १९ घरकुलांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
…..डॉ. भरत बास्टेवाड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.