महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सदर निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहणार असून, निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडणे तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. त्याकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ प्रमाणे बंदी आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
या आदेशान्वये मतदान समाप्ती करीता निर्धारित केलेल्या वेळेच्या ४८ तास अगोदरच्या कालावधीमधे खालील कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.
*५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास किंवा फिरण्यास मनाई*
५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास किंवा फिरण्यास मनाई आहे. निवडणूक प्रचार करणे, सार्वजनीक सभा, बैठका घेणे इत्यादी कृतीस मनाई आहे. (तथापी घरोघरी भेटी / प्रचारास मनाई नाही).
. राजकीय प्रचार करण्याच्या उद्देशाने बल्क मेसेज करण्यास मनाई आहे.
ज्या मतदार संघात मतदान होणार आहे तेथे मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते / नेते यांना त्या मतदारसंघात थांबणेस मनाई आहे. लाउडस्पीकर वापरास मनाई आहे.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, वायरलेस किंवा इतर संपर्क साधने घेवुन जाण्यास मनाई आहे. (निवडणुकीशी संबंधीत कामाकरिता नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी व सुरक्षेकरीता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी वगळून).
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात लाउडस्पीकर / मेगाफोन वापरणे / आरडा-ओरड करणे / गोंधळ घालणे / गैरवर्तन करणे इत्यादी कृती करण्यास मनाई आहे.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस शस्त्र घेवुन जाण्यास मनाई आहे. (अपवाद – मतदान केंद्राच्या सुरक्षेकरिता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी, ज्या व्यक्तीस SPG/Z+ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अशा व्यक्तीस साध्या वेशात एक सुरक्षा रक्षक शस्त्र लपवलेल्या स्थितीत घेवुन जाता येईल).
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात आस्थापना चालू ठेवण्यास मनाई आहे.
मतदारांना देण्यात येणारी चिड्डी पांढऱ्या कागदावर असावी. त्यावर कोणत्याही उमेदवाराचे नाव, पक्षाचेचिन्ह, पक्षाचे नाव नसावे. मतदान केंद्राच्या परिसरात पक्षाचे कार्यकर्त्यांचे निवासस्थाने असल्यास त्याठिकाणी प्रचार करणे, बैठका घेणे, मतदानाकरिता जाणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे.
मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस वाहन आणण्यास मनाई आहे. (अपवाद अपंग / वृध्द / आजारी मतदारांना घेवुन येणारी वाहने).
मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसराचे आत राजकीय पक्षांचे / उमदवारांचे निवडणूक बुथ लावण्यास मनाई आहे.
मतदान केंद्राच्या २०० मीटर बाहेर निवडणूक बुथ लावताना पुढील अटींचे पालन करावे. अ. बुथ लावणेकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी व बुथ लावणेबाबत निवडणूक निर्णयअधिकारी यांना आगावू माहिती द्यावी. प्रत्येक बुथवर कमाल एक टेबल, दोन खुर्चा असाव्यात. बुथ करीता लावलेल्या मंडपाचा आकार १० X १० फुट पेक्षा जास्त नसावा.
*मतदारसंघाच्या / जिल्ह्या बाहेरील आलेल्या व्यक्तीवर निर्बंध .*
प्रचार कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष प्रचाराला भरीव चालना देण्यासाठी, मतदार संघाच्या बाहेरुन पाठीराख्यांना आणण्यासह त्यांच्या सर्मथकांची हलवाहलव करतात. ही वस्तुस्थीती लक्षात घेता, प्रचार कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी, मतदारसंघाच्या बाहेरुन आणलेले आहेत व जे त्याच्या / तिच्या मतदारसंघाचे मतदार नाहीत असे राजकीय कार्यकर्ते / पक्ष कार्यकर्ते / मिरवणुकीतील कार्यकर्ते / प्रचार कार्यकर्ते, इत्यादीना नियमितपणे मतदारसंघामध्ये उपस्थित राहता येणार नाही, कारण प्रचार संपल्यानंतर, त्यांच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण धोक्यात येऊ शकते.सबब उमेदवाराच्या प्रचाराशी संबंधित जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना जिल्ह्यात राहता येणार नाही. असे मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.
*हॉटेल रिसॉर्ट चालकांना माहिती देणे बंधनकारक*
जिल्ह्यातील सर्व हॉटेल / रिसॉर्ट / गेस्ट हाऊसेस / लॉजींग बोडींग / होम स्टे इत्यादी ठिकाणी जिल्ह्याबाहेरील सदर व्यक्तींना प्रवेश देता येणार नाही.
सदर आस्थापना चालकांनी सदर ठिकाणी प्रवेश केलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती संबंधित पोलीस स्टेशनला दर तासाने व्हॉट्सअॅप व ई-मेलव्दारे सादर करावी.पोलीस यंत्रेणेनी सदर आस्थापनांची निवडणूक प्रक्रीया संपेपर्यंत सतत कडक तपासणी करावी.
सदरचा मनाई आदेश हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील (पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात) विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वा. पासून ते दिनांक २० नोव्हेंबर पर्यंत रोजी सायंकाळी ७.०० वा. पर्यंत अंमलात राहील. तसेच सदरच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.असेही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.