अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
गणपती बाप्पा मोरया, पूढच्या वर्षी लवकर या….असा जयघोष करत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तीमय वातावरणात रायगड जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या येथील श्रीगणेश भक्तगणांनी निरोप देण्यात आला. रायगड जिल्ह्यात 17हजार 359 खासगी तर 144 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पोलिस स्टेशन हद्दीत 1लाख 3हजार 24 खासगी तर 273 असे एकूण 1 लाख 3 हजार 297 गणेशमूर्तींचे आगमन झाले होते.
कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेणारे भाविक गणेश चतुर्थीला श्रींची घरोघरी प्राणप्रतिष्ठापना केली करतात. कुणी पाच तर कुणी दहा दिवस उत्सव साजरा करतात. अनंत चतुर्दशीला गणरायाची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत येथे विसर्जन करण्यात आले. पाऊस नसल्यामुळे गणेश विसर्जनात अडथळा आला नाही. त्यामुळे मिरवणुकीत उत्साह होता.
डीजेवर न्यायालयाने कडक निर्बंध लावल्यामुळे ढोल-ताशांच्या गजरासह पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेले दहा दिवस बाप्पाच्या आगमनाने वातावरण चांगलेच भक्तिमय बनले होते. विविध सार्वजनिक मंडळांनी राष्ट्रहिताचे तसेच देशप्रेम जागवणारे देखावे उभे केले होते. भजन, कीर्तनासह सांस्कृतिक कार्यक्रमाची दहा दिवस चांगलीच रेलचेल अनुभवाला मिळाली.
कोकणामध्ये बाप्पाचा पाहुणचार करण्यासाठी आलेले चाकरमानी देखील गौरी-गणपतींना निरोप देऊन माघारी परतले होते.मिरवणुकीमध्ये डीजे लावण्याबाबत उच्च न्यायालयाने ठणकावल्यामुळे डीजेचा आवाज ऐकू आला नाही.अलिबागच्या समुद्रकिनारी सायंकाळी सहानंतर बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनास सुरुवात झाली. त्यावेळी बाप्पाची ज्या वाहनांवरून मिरवणूक काढण्यात येणार होती ती वाहने हार, फुलांसह विद्युत रोषणाईने चांगलीच सजवली होती. ढोल- ताशा, बँजो पथकाच्या तालावर आबालवृद्धांसह महिलाही थिरकताना दिसत होत्या. मिरवणुकीतील बँजो पथक वैशिष्ट्यपूर्ण तालामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. समुद्रकिनारी निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. त्यात अलिबाग नगर पालिकेने ठेवलेल्या कलशाचा समावेश होता. मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रात्री १२.०० वाजेपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. वाद्यांना विश्रांती बारा वाजताच देवून नियमांचे पालन गणेशभक्तांनी स्वेच्छेने केले. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही खवय्यांनी चांगलीच गर्दी केली होती.
गणराया आम्हाला चांगले आरोग्य लाभो, आम्हाला सुखी ठेव…आमची भातशेती चांगली होऊ दे, भरपूर पीक आमच्या हाती मिळू दे, असे साकडे लाडक्या गणरायाला भक्तांनी घातले. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, असा जयघोष करत गणरायाला सर्वांनी भक्तीमय वातावरणात निरोप दिला.गणेशमूर्तींचे विसर्जन सर्व कर्मचारी होडीमध्ये गणेशमूर्ती घेवून खोल पाण्यात विसर्जित करण्याचे काम करीत होते.
गणपती बाप्पा जसे वाजत-गाजत येतात, तसेच धूमधडाक्यात जातात. जिल्हाभर गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. या मंगलमूर्तीच्या आनंदोत्सवात सर्वजण सहभागी झाले होते. सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी तर हा उत्सव मोठ्या मानाचा असतो. प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी झटत असतो. मंडळांनी यंदा तयार केलेले देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती.
रायगड जिल्ह्यामध्ये 17 हजार 359 गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. सायंकाळी पाचनंतर मिरवणुकीला सुरुवात झाली . काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली गेली. मिरवणुकीचा सोहळा जल्लोषात साजरा करता यावा यासाठी मंडळांकडून तयारी करण्यात आली होती.
आवाजावरही होते पोलिसांचे लक्ष
दहा दिवसांच्या बाप्पाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. मिरवणूक सायंकाळी निघाली होती. दरम्यान, अनेक ठिकाणी स्पीकरच्या माध्यमातून गाणी लावली जाणार आहेत. , दिलेल्या नियमानुसार आवाज ठेवूनच गाणी वाजविण्यात यावी, अशी सूचना पोलिसांकडून मंडळांना देण्यात आली आहे होती. अन्य वाद्यांच्या आवाजावर पोलिसांचे लक्ष ठेवले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
मिरवणूक सोहळा आनंदमय व शांततेत पार पाडावा यासाठी मंडळांशी समन्वय साधण्याचे काम स्थानिक पोलिसांमार्फत करण्यात आले होते. रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. लेझरच वापर करू नये, याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशदेखील काढले होते. मिरवणूक मार्ग पाहिले असून, विसर्जन घाटची पाहणी करण्यात आली होती. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन केले गेले होते.. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवला होता.
अलिबाग समुद्र किनारी गणेश विसर्जन वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि त्याचे सहकारी उपस्थित होते
—