रायगड ( अमुलकुमार जैन )
रायगड जिल्ह्यतील मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्रात पाण्याचा आंदाज न आल्याने एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून धर्मेंद्र देशमुख (वय 55 वर्षे, मूळ राहणार, आंबले, तालुका-, शिरूर,जिल्हा पुणे,सध्या राहणार महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, पिसोली, तालुका हवेली,पुणे ) हे त्यांचे सहकारी रवी जनार्दन फुले, विशाल अशोक पाटील, रणजित काशीराम ननावरे, आकाश परशुराम सोनवणे, प्रकाश संजय वाघमारे, सोनाली सागर फाले, शुभांगी रामचंद्र माने, वैशाली रामचंद्र ननावरे, मनीषा संदीप शिंदे यांच्यासहित इतर सहकारी शिक्षक आणि एक इतर असे तेरा जणाचा समूह हा शुक्रवारी दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी पहाटे चार वाजता एका खासगी ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. सकाळी अकराच्या सुमारास सर्व जण काशीद समुद्र किनारी आले होते. मात्र त्यांना काशीद समुद्राचे पाणी बघून पोहण्याचा मोह आवरता आला नाही. धर्मेंद्र देशमुख आणि त्यांचे सहकारी हे समुद्र स्नान करण्यासाठी समुद्रात गेले. मात्र धर्मेंद्र देशमुख यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. धर्मेंद्र देशमुख हे बुडत असल्याचे काशीद समुद्र किनारी असणारे जीव रक्षक दलाचे सदस्य यांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून स्पीड बोटीद्वारे समुद्र किनारी आणले.
तदनंतर धर्मेंद्र देशमुख हे बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने अधिक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात धर्मेंद्र देशमुख यांना वैद्यकीय अधिकारी सुरक्षा म्हात्रे यांनी तपासून दुपारी दोन वाजून ५५मिनिटाच्या च्या सुमारास मृत घोषित केले.
मोठ्या संख्येने पर्यटक काशीद समुद्र किनारी येत असून पोहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पर्यटनासाठी आलेल्या शिक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेचा अधिक तपास मुरुड पोलीस करीत आहेत.
—————————————————-