
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
रायगड व सातारा सीमावर्ती भागातील पार्वतीपूर म्हणजेच पारसोंड-पार येथील श्रीरामवरदायिनी मंदिरामध्ये येत्या 3 ऑक्टोबररोजी सकाळी 8 वाजता देवीच्या मुर्तीस जलाभिषेकानंतर सकाळी 10 वाजता देवीच्या घटस्थापनेसोबत नवरात्रौत्सव सुरू होणार असल्याची माहिती श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट, पारसोंड पारतर्फे देण्यात आली.
‘रामवरदायिनी माता। दास धुंडूनी आणली। ओळखी पाडिता ठायी। भिन्न भेद असेचिना॥’ असा उल्लेख समर्थ वाङमयामध्ये आढळून येतो. ‘आंतरनिष्ठ अखंड ध्यानी। संन्निध रामवरदायिनी। विश्वमाता त्रैलोक्यजननी। मूळमाया॥’ समर्थ रामदासांनी जगन्माता आदिशक्ती म्हणून वर्णन केलेली आणि साक्षात प्रभू श्रीरामांना सीतामाईंच्या भेटीचा वर देणारी अवघ्या महाराष्ट्राची तसेच भारत वर्षातील विविध राज्यातील भाविकांची कुलस्वामिनी अर्थात पार गावी वसलेली श्रीरामवरदायिनी आईचा नवरात्रौत्सव सर्व भक्तांच्या प्रतिक्षेसह उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक हेमाडपंथी धाटणीचे व निसर्गसंपन्न परिसर लाभलेल्या मंदिरात वसलेल्या मातेच्या मनमोहक मूतींर्चे शारदीय नवरात्रौत्सवात दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महापुर पार गावी लोटतो. श्रीरामवरदायिनी मातेच्या वार्षिक नवरात्र उत्सवाला येत्या गुरुवार, दि. 3 ऑक्टोबरपासून अत्यंत दिमाखात सुरुवात होत आहे. अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापनेने या सोहळयाची सुरुवात होणार असून प्रतिपदेच्या दिवशी आदिशक्ती आणि विविध देवदेवतांचा अभिषेक, पारंपारिक आभूषणे आणि वेशभूषेने आरतीसह नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे. ललिता पंचमीचा कुंकुमार्चन, अष्टमीला घातला जाणारा आई श्रीरामवरदायिनी देवीचा गोंधळ तसेच दैनंदिन सहस्त्रनाम पठण असे धार्मिक कार्यक्रम या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
नवरात्रौउत्सवादरम्यान सुप्रसिध्द कीर्तनकारांची कीर्तन सेवा, विविध भजन मंडळाची भजन सेवा असे उपक्रम पार पडणार आहेत. नवरात्रौत्सवात मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट आणि विविध अन्नदात्यांच्या मदतीने सलग दहा दिवस महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. अश्विन शुध्द प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या या सोहळयाची सांगता विजयादशमीच्या दिवशी सीमेवर सिमोल्लंघनावेळी गावातून मातेच्या पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे. यानंतर मंदिरामध्ये सर्व भाविकांना शमीपत्र रूपी सोने वाटप करून होणार आहे.
घटस्थापनेपासुन विजयादशमीपर्यंत आयोजित होणाऱ्या या शारदीय नवरात्र उत्सव सोहळयास उपस्थित राहुन मातेचे दर्शन घेत भाविकांनी आपले जीवन सुखमय व कृतार्थ करण्याचे आवाहन श्रीराम वरदायिनी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार यांच्याकडून करण्यात आले आहे.