शहरातील तांबडभुवन भागात केशकर्तनालयामध्ये नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या तरूणाचा सोमवारी कुंभळवणेतील आडवाटेवर मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर उघडकीस आली. मयताच्या प्रेतालगतच एक मेलेला सापही आढळून आल्याने मृत्यू सर्पदंशाने की अन्य कारणाने झाला, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
पोलादपूर शहरातील तांबडभुवन भागात हेअर कटींग सलून चालविणारा विष्णू कदम हा नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय करणारा कापडे खुर्द गावातील तरूण सोमवारी सलून बंद असल्याने त्याची कोसमवाडी भागातील बलुतेदारी करण्यासाठी गेला होता. हा तरूण रात्री घरी परत न आल्याने त्याच्या भावाने तांबडभुवन येथील अनिल पवार याच्या मदतीने मंगळवारी सकाळपासून विष्णूचा शोध घेतला असता एका व्यक्तीने त्याला कुंभळवणे गावाच्या हद्दीतील आडवाटेने परत येताना एक इसम पायवाटेवर आडवा पडला असल्याचे दिसून आले असून हालचाल करीत नसल्याचे सांगितले. यामुळे अनिल पवार आणि विष्णू कदम याच्या भावाने त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आडवाटेकडे जाऊन सदरची व्यक्ती कोण आहे, याबाबत पाहिले असता तो विष्णू कदम असल्याची खात्री पटली.
यावेळी मयत विष्णूच्या प्रेतालगतच एक मेलेला साप आढळून आल्याने सर्पदंश झाल्यावर त्या सापाला मारल्यानंतर विष्णूदेखील मयत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनास्थळावरून प्रेत हलविताना मृताच्या कानातून रक्त ठिबकत असल्याचे दिसून आल्याने मृत्यूच्या कारणाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. पोलादपूर पोलीसांनी प्रेताची आणि घटनास्थळाची तपासणी करून प्रेत पोस्टमॉर्टेमसाठी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये पाठविले असून पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतरच विष्णूच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी तपास सुरू केला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.