स्वत: खासगीरित्या नळपाणीपुरवठा योजना राबवून पाणीटंचाईवर यशस्वीपणे मात करणाऱ्या अब्दुलहक खलफे या सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवार, दि. 9 एप्रिल 2025 रोजी पोलादपूर तहसिल कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
कालवली येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांनी कालवली येथील जल जीवन मिशनच्या अपूर्ण कामाबद्दल जागृत नागरिक म्हणून अनेकवेळा उपअभियंता कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून जलजीवन योजनेची अनेक कामे अपूर्ण असल्याचे तसेच पाण्यसाचे पाईप फाटणे, जोडणी व्यवस्थित न केल्याने वारंवार तुटणे, सोलरचे काम, पाटीलवाडी येथील टाकी, विठ्ठलवाडीतील पंपाचे काम तसेच सावित्री नदीतील जॅकवेलचे काम अपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले आहे.
कालवली गावातील लोकांना 2005 पासन पाणीयोजनेच्या कामाची प्रतिक्षा असून आजतागायत त्यांच्या आशांना हरताळ फासला गेला आहे. कालवलीतील विविध वाडयांतील ग्रामस्थ आपआपल्या परिने पाण्याची व्यवस्था करीत असून त्यांना पाण्याचा टँकर घेणे शक्य होत नाही. परिणामी, पाण्याअभावी बरिचशी लोकसंख्या स्थलांतरीत झाली आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रशासन कालवलीतील जनतेला कधी पाणी मिळेल याबाबत ठामपणे ग्वाही देत नसून प्रशासनाची उदासिनता, नियोजनाचा अभाव, ठेकेदाराला दिले जाणारे अभय आणि कोटयवधी रूपये खर्च होऊनही ग्रामस्थांना एक थेंबही पाणी नळाद्वारे मिळत नसल्याचा निषेध करण्यासाठी अब्दुलहक खलफे या सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्या बुधवारी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.
उपअभियंता पेडणेकर यांच्या सेवानिवृत्तीवेळीच मुदतवाढ देणाऱ्या अभियंत्यांसह माजी लोकप्रतिनिधींनी पेडणेकर यांना मुदतवाढ देऊन काय साध्य केले, असा सवाल या पार्श्वभूमीवर सर्वत्र विचारला जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हक खलफे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पाणीप्रश्नी तसेच रस्तेव्यवस्थेबाबत अनेकवेळा उपोषण करून विषयावर तोडगा काढण्यात यश मिळविले असल्याने यावेळी देखील प्रशासनाने त्यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याचा गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.