नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पेण तालुक्यातील मळेघर येथील ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव (वय ४८) यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार वकिल असून त्यांच्या वयोवृद्ध अशील यांना कोर्टाच्या कामकाजासाठी तसेच महावितरण (एमएसईबी) मध्ये सादर करण्यासाठी वडगाव (ता. पेण) येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक होता. यासाठी त्यांनी १७ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला होता. अशील यांच्या वृद्धत्वामुळे त्यांनी १० एप्रिल २०२५ रोजी तक्रारदारांच्या नावे अधिकृत ‘कुलमुक्त्यार’ पत्र तयार करून दिले होते.
त्यानुसार तक्रारदारांनी ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधून कामाची विचारणा केली असता, त्यांनी त्यासाठी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने लगेचच नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीची पडताळणी ११ एप्रिल २०२५ रोजी शासकीय पंचासमक्ष करण्यात आली. यामध्ये आरोपी जाधव यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा कारवाई रचण्यात आली. सापळ्यादरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून ५ हजार रुपये घेतल्यानंतर त्याला रंगेहात अटक करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ अन्वये पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक अरुंधती जयेश येळवे यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. संतोष पाटील, स.पो.उपनिरीक्षक जाधव, म.पो. ना. बासरे, व पो.शि. चौलकर यांनी पार पाडली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.