PEN : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; धाकधूक वाढली, एकूण ७३.0२% मतदान

Voting
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
१९१ पेण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३ लाख ७९७९ मतदारांपैकी ७३.0२% म्हणजेच २लाख २४८९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ लाख १६०८७ पुरुष आणि १ लाख ८८०५ महिला मतदारांचा सहभाग होता. ही निवडणूक ७ उमेदवारांमध्ये झाली असली तरी खरी चुरस महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात पाहायला मिळाली. यावेळी नक्की बाजी कोण मारणार याची वाट मात्र येत्या 23 तारखेपर्यन्त पहावी लागणार.   
महायुतीचे भाजप उमेदवार रवीशेठ पाटील यांचे पारडे जड?
महायुतीचे उमेदवार रवीशेठ पाटील यांना भाजपसह मित्रपक्ष, विद्यमान आमदार असल्याचा फायदा मिळाला. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, भाजपचे खासदार धैर्यशील पाटील, आणि महायुतीतील इतर नेत्यांनी प्रचारात मोठा सहभाग घेतला. मात्र, काही कार्यकर्त्यांनी अपेक्षित प्रमाणात रसद मतदारांपर्यंत पोहोचवली नाही, अशी चर्चा आहे. नाराज मतदारांची भूमिका रवीशेठ पाटील यांच्या विजयावर मोठा परिणाम करू शकते.
महाविकास आघाडी: बिघाडीमुळे नुकसान?
महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव गट) आणि शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने मतविभाजन झाले.
शेकापचे अतुल म्हात्रे:
नवखे असूनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची आघाडी घेतली. महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांना आकर्षित करणारे उपक्रम राबवून चांगली वातावरण निर्मिती केली. माजी सभापती संजय जांभळे यांचा पाठिंबा मिळाल्याने ऊर्जा वाढली, मात्र आघाडीतील बिघाड त्यांच्यावर विपरीत परिणाम करू शकतो.
शिवसेनेचे प्रसाद भोईर:
अपक्ष उमेदवार म्हणून सुरू केलेला प्रचार आणि नंतर शिवसेनेच्या मतांची साथ ही त्यांची जमेची बाजू ठरली. मात्र शेवटच्या टप्प्यात पसरलेल्या अफवांनी त्यांना अडचणीत आणले. मतदारांपर्यंत प्रचाराची रसद व्यवस्थित पोहोचवता आली नाही, अशी चर्चा आहे, ज्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
इतर उमेदवारांची भूमिका
वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र कोळी, बसपाच्या अनुजा साळवी, अभिनव भारतचे मंगल पाटील, आणि अपक्ष विश्वास बागुल यांनीही निवडणूक रिंगणात उतरून आपली ताकद आजमावली. मात्र, या उमेदवारांचे प्रभाव सीमित असल्याचे दिसून आले.
२३ तारखेला निकाल स्पष्ट
महायुतीच्या उमेदवाराचे कमळ फुलणार की महाविकास आघाडीच्या शिट्टीचा आवाज घुमणार, की शिवसेनेची मशाल पेटणार हे २३ तारखेला निकालाद्वारे स्पष्ट होईल. मतदारसंघातील चुरस, नाराजी व आघाडीतील बिघाड यामुळे अंतिम निकाल चांगलाच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading