मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी दि. 26 जानेवारी 2025 रोजी होण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला असून कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे,म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 व सध्याचा रा.मा.क्र.66 वरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मार्गांचे काम सुरू बूमर या यंत्राद्वारे सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. 12 सप्टेंबर 2023 रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुयारी मार्गाचा शुभारंभ दुहेरी रस्ता स्वरूपात करण्यात आला.
पहिला भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतरही आतील काम सवडीनुसार सुरू ठेवण्यात आले असून अलिकडेच पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास गेले असल्याने या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली. या भुयारी मार्गात वाहतुकीचा खोळंबा व वाहनांचा समोरासमोर आल्याने अपघातदेखील झाले आहेत. मात्र, साधारणपणे 45 मिनीटांचा कशेडी घाटातून वाहतूकीसाठी लागणारा वेळ आता अवघ्या 8-10 मिनिटांवर आला असल्याने तसेच कशेडी घाटातील अपघाताचे प्रमाणही घटले असल्याने वाहनचालकांना भुयारी मार्गातील वाहतूकीस प्रथम पसंती दर्शविली आहे. मध्यंतरी, कातळी भोगावपर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गर्डर बसविण्याच्या कामानिमित्त भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात येऊन कशेडी घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली होती.
आता पुलावर गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी शनिवारी दुसऱ्या भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे, विद्युत प्रकाश झोताचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून दोन्ही भुयारांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्णावस्थेत आहेत, व्हेंटीलेशनसाठी तसेच भुयारामध्ये हवा खेळती राहण्यासाठी 10 मोठया आकाराचे एक्झॉस्ट फॅन बसविण्यासाठी आणून भुयारामध्येच ठेवण्यात आले आहेत, दुसऱ्या भुयारी मार्गातही वरील बाजूच्या कातळामधून चारपाच ठिकाणी पाण्याची संततधार सुरू आहे. मात्र, भुयारी मार्गातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास उपयुक्त असल्याचे दिसून आले. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर या भुयारी मार्गातून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होऊन पहिल्या भुयारी मार्गातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होणार आहे.
2023मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर एकमार्गी वाहतूक भुयारी मार्गातून सुरू करण्याची राजकीय इच्छाशक्ती तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दाखवून प्रत्यक्षात एकाच भुयारातून मुंबईकडे आणि कोकणाकडे अशी वाहतूक सुरू करण्याची तत्परता दाखविली होती. यानंतर केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी कातळी भोगावच्या भुयारी मार्ग व भुयारापर्यंतच्या रस्त्यावरील पुलांच्या कामांची हवाई पाहणी केली होती.
आज प्रजासत्ताक दिनी कातळी भोगावच्या हद्दीतील कशेडी घाटाला पर्यायी दुसरा भुयारी मार्ग सुरू होणार नाही, अशी अधिकृत माहिती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अभियंत पंकज गोसावी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे सांगताना भुयारी मार्गापर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गेल्याच महिन्यांमध्ये बसविण्यात आलेले गर्डर आणि पिलर्स एकसंध होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार असल्याचे स्पष्ट केले. असे न केल्यास पिलर्स आणि गर्डमधील काँक्रीट तडकण्याची शक्यता ओव्हरलोड वाहतूकीमुळे संभवणार असल्याचेही सांगितले आहे. तरीदेखील शिंदे डेव्हलपर्स प्रा.लि.कंपनीचे साईट मॅनेजर अभय गिरी यांनी प्रजासत्ताक दिनीच भुयारी मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने भुयारी मार्ग सुसज्ज ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून कोणत्याही आदेशासाठी तयारी असल्याचे स्पष्ट केले.
–—————————————————-
आयआयटीमार्फत उपाययोजनेचे ‘टिपिकल’ उत्तर खचणाऱ्या महामार्गाप्रमाणे गळतीवरही
कशेडी घाटातील दरवर्षी खचणाऱ्या रस्त्यावर दरवर्षी मलमपट्टीवर कोटयवधी रूपये खर्च करणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने दरवर्षी आयआयटीच्या तंत्रज्ञांकडून खचणाऱ्या महामार्गाची पाहणी करून उपाययोजनेच्या चर्चा घडविल्या. त्याचप्रमाणे भुयारी मार्गाच्या छपराच्या बाजूने भुयार खणल्यापासून पाण्याची संततधार गेल्या चार वर्षांपासून सुरू असून वरीलबाजूच्या कातळामध्ये जलाशय असण्याच्या शक्यतेबाबत बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर आयआयटीमार्फत पाहणी करून उपाययोजना करण्याचे टिपिकल उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आले होते.
–—————————————————-
भुयारी मार्गाचे काम अपूर्ण; शुभारंभ रखडण्याचे कारण पुलावरील गर्डर
प्रस्तुत प्रतिनिधीने कातळी भोगावच्या दुसऱ्या भुयारी मार्गातून पाहणी करण्यासाठी खेडपर्यंत प्रवास केल्यानंतर हे काम पूर्ण नसल्याची खात्री पटल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अभियंत पंकज गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता भुयारातील काम वाहतूक करण्याइतपत पूर्णत्वास गेले असले तरी कातळी भोगावच्या पुलावरील कामाचे क्युरिंग अपूर्ण असल्याने प्रजासत्ताकदिनी वाहतूक सुरू करता येणार नसल्याचे सांगून भुयारी मार्गाचा प्रजासत्ताकदिनी शुभारंभ रखडण्याच्या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.