
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मार्गांपैकी नव्याने वाहतुकीस सुरू झालेल्या भुयारातील अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी येत्या 20 सप्टेंबरपासून नवीन भुयारी मार्गातील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या महामार्ग दौऱ्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 5 सप्टेंबरपासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी गणेशोत्सव काळात एका भुयारी मार्गातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती; मात्र त्यानंतर पुन्हा तो भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू झाले. यंदा 25 फेब्रुवारी 2024 पासून शिमगोत्सवापूर्वीच कोकणात ये-जा करण्यासाठी लहान वाहनांना कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर तब्बल एका वर्षाने अपूर्ण असलेला दुसरा भुयारी मार्गदेखील गणेशोत्सवाच्या प्रारंभी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होऊन कशेडी घाटातील 45 मिनिटांचा धोकादायक घाटरस्त्यामुळे वेळ वाचण्यासह इंधनाच्या बचतीसोबतच वाहतूकीच्या कोंडीपासून चाकरमानी सुखावले होते.
पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीनंतर परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलीसांनी योग्य नियोजन केल्यामुळे कशेडी घाट आणि पर्यायी भुयारी मार्गाच्या परिसरात वाहतूकीची कोंडी झाली नाही. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवला नाही. त्यामुळे भुयारी मार्गाचा वापर केल्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्तता सिध्द झाली आहे. कशेडी घाटाला दोन्ही पर्यायी भुयारी मार्गातील सतर्कतेचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष दक्षता घेतल्याचे दिसून आले. दोन्ही भुयारी मार्गातून प्रवास करणाऱ्या वाहनांचा वेग कमी ठेवण्यासाठी दोन्ही भुयारी मार्गांच्या प्रवेशस्थळी सुरक्षा कर्मचारी तैनात ठेवण्यात आल्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांचा वेळ वाहतुक कोंडी टळल्याने वाचला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कशेडी मार्गाला पर्यायी भुयारी मार्गाच्या अपूर्ण कामांपैकी गटार लाईन, दर्शनी भाग, संरक्षक भिंत, सिमेंट काँक्रीटीकरणाच्या अपूर्ण कामासह लाईट, डिजिटल स्पीड टायमिंगची कामे पूर्णत्वास न्यायची असल्याने मुख्यमंत्री ना. शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चव्हाण यांच्या शब्दांखातर कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाले होते. त्यापैकी नव्याने सुरू झालेला भुयारी मार्ग आता गणेशोत्सव संपताच येत्या 20 सप्टेंबरपासून पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे.