
माथेरान (मुकुंद रांजणे)
दस्तुरी नाक्यावरील घोडेवाल्यांकडून पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल होत असल्यामुळे इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याने माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या वतीने दि.२७ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले होते. याबाबत काहीही ठोस उपाययोजना केली नाही तर १८ मार्चपासून माथेरान बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा दिला होता तरीसुद्धा या शुल्लक मागणीची दखल संबंधीत प्रशासन सुद्धा याबाबत कूचकामी ठरल्याने नाईलाजाने माथेरानकरांना या शुल्लक मागणीसाठी बेमुदत बंद करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करावा लागला आहे.
स्थानिकांची अल्पशी मागणी प्रशासनाकडून का पूर्ण होऊ शकली नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. आजच्या या बंदला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला असून याचवेळी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्रित आल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.
काही वर्षांपूर्वी राजकीय आशीर्वादाने बहुतांश व्यवसायात आपले ठाण मांडून बसलेल्या परिसरातील मंडळींकडून दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना ज्याप्रकारे वेठीस आणून घोड्यावर बसण्यासाठी प्रवृत्त केले जाते आणि त्यातूनच अवाच्या सव्वा रक्कम उकाळली जाते.फसवणूक करून अन्य माहिती बाबत दिशाभूल केली जाते याच एकमेव कारणास्तव सद्यस्थितीत ह्या सुंदर स्थळावर पर्यटनाला उतरती कळा लागली असल्याने सर्वसामान्य स्थानिक लोकांच्या व्यवसायावर गदा आली आहे.
ऐन सुट्ट्यांच्या हंगामात सुध्दा गावात पर्यटक फिरकताना दिसत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर स्थानिकांवर उपासमारीची वेळ येऊन वेळप्रसंगी गाव सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच फसवणूक झालेले पर्यटक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत असल्याने माथेरानची प्रतिमा खूपच मलिन होत आहे. यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून माथेरान बेमुदत बंद करण्यात आले असून या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
एकूण तीस संघटना, मंडळे, संस्था, यांचे या बंदला समर्थन मिळाले आहे. तर मोठया प्रमाणावर महिला देखील पर्यटन अबाधित ठेवण्यासाठी सामील झाल्या होत्या. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदार संघातील हे पर्यटनस्थळ असल्याने ते उद्या दि.१९ रोजी इथे येऊन स्थानिकांच्या प्रश्नांची कशाप्रकारे उकल करून तोडगा काढतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या बंद वेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी,शिवाजी शिंदे, कुलदीप जाधव, प्रवीण सकपाळ,अजय सावंत,प्रकाश सुतार, हॉटेल इंडस्ट्रीचे उमेशभाई दुबल,विवेक चौधरी, प्रसाद सावंत,व्यापारी संघटना अध्यक्ष राजेश चौधरी, मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव,निखिल शिंदे,विजय कदम, नितेश कदम,गजानन अबनावे,महिला आघाडीच्या संगीता जांभळे, सुहासिनी दाभेकर, ज्योती सोनवणे, प्रतिभा घावरे, सुहासिनी शिंदे यांसह असंख्य माथेरानकर उपस्थित होते.