माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
मागील आठ दिवसांपासून माथेरानमध्ये सतत वीज जाण्याचे प्रकार वाढल्याने येथील स्थानिक व्यावसायिक व आलेले पर्यटक हैराण झाले असून कमी दाबाने व सातत्याने वीज जाण्यामुळे अनेकांच्या इलेक्ट्रिक वस्तू देखील खराब झाल्या आहेत.
15 ऑगस्टला लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी होती व या काळातच एक संपूर्ण रात्र वीज गायब होती तर इतर दिवशी सातत्याने वीज जाण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे आलेले पर्यटक स्थानिक व्यवसायिकांना प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. अनेकांनी वातानुकूल रुम्सचे बुकिंग केल्याने त्याबाबत विचारणा करत होते व वीज नसल्याने पैसे परत मिळण्याकरता स्थानिक व्यवसायांबरोबर अनेकांचे वाद झाले परंतु वीज वितरण कडून मात्र सततच्या वीज जाण्याने काहीही स्पष्टीकरण मात्र होताना दिसत नाही, वीज गायब झाल्यानंतर नागरिकांना कोणत्याही सूचना मिळत नाहीत, वीज पुन्हा केव्हा सुरू होईल याची कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही त्यामुळे व्यावसायिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.
आताही येथे सतत वीज जात आहे , ही वीज जेव्हा परत येते तेव्हा एक तर कमी दाबाने वीज पुरवठा होत असतो किंवा फेज गायब असतात त्यामुळे अनेकांचे टीव्ही, फ्रिज, इंवर्टर, एसी खराब होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे.
माथेरानमध्ये नव्याने बदली होऊन आलेले विद्युत अभियंता यांना येथील स्थानिक प्रश्न माहीत नाही परंतु तरीही त्यांनी माथेरान मधील प्रश्न अवगत करून त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे सांगितले असून नेरळ माथेरान घाटामध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने त्यावर उपाययोजना करू असे सांगितले आहे.
नेरळ, कडाव येथील कळंबोली फिडर येथून माथेरानला वीज पुरवठा केला जातो व या मार्गावर अनेक गावांना ही वीज दिली गेली आहे व या गावांमध्ये या मार्गावर काही बिघाड झाल्यास माथेरानची ही वीज गायब होत असते त्यामुळेच माथेरान पर्यटन दर्जा पाहता माथेरान करीता एक वेगळी वीज वाहिनी असावी अशी मागणी स्थानिकांकडून अनेक वर्षापासून होत आहे तर नेरळ माथेरान घाटातील जुमापट्टी ते वॉटर पाईप या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने येथील वीज वाहिन्या जमिनी खालून असाव्यात यासाठी माथेरानकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
या भागांमध्ये जुन्या पद्धतीने पोल वरून आलेल्या वीज वाहिन्या असल्याने त्यावरती झाडे पडणे व वाहिन्या तुटणे याचे प्रमाण पावसाळ्यामध्ये वाढत असते व घनदाट जंगलामुळे त्या ठिकाणी काम करणे कर्मचाऱ्यांना जिकीरीचे ठरत असते त्यामुळे माथेरान करांना अनेक तास अंधारात राहावे लागते त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन माथेरानच्या समस्यांना सोडवाव्यात अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.
—————————————————–
नेरळ( कळंबोली ) येथील वीज केंद्रातून माथेरानला वीज पुरवठा केला जातो परंतु नेरळ येथे काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचप्रमाणे पावसामुळे घाटात वीज वाहिनीवर झाडे उन्मळून पडल्यास वीज पुरवठा खंडित होत असतो.
…संतोष पादिर, सहाय्यक अभियंता एम.एस. ई.बी.