
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरानमध्ये नगरपालिका मार्फत अनेक वर्षांपासून एकाच ठेकेदाराला वीज साहित्याचा ठेका दिलेला आहे. परंतु सदर ठेकेदार माथेरानमध्ये केव्हाच उपलब्ध होत नसून अनेक भागातील वीज पुरवठा त्याचप्रमाणे वीज साहित्य नसल्याने नागरिकांना अंधारातून चाचपडत जावे लागते यासाठी संबंधित ठेकेदाराकडून हा ठेका ताबडतोब काढून घ्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
पर्यटनस्थळी अशी परिस्थितीपर्यटनाच्या दृष्टीने खूपच घातक असून याचा परिणाम पर्यटनावर होताना दिसून येत आहे. मुख्य रस्त्यावर त्याचप्रमाणे गावातील विविध ठिकाणी आजही विजेच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून गणेशोत्सव काळात सुध्दा विसर्जन स्थळी वीज नसल्याने गणेश भक्तांना अंधारात कसेतरी विसर्जन करावे लागले. यामुळे नगरपालिका बाबतीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधीत ठेकेदाराला पाठिशी न घालता त्याला नोटीस बजावून सदर ठेका काढून घ्यावा अशी मागणी गावात सर्वत्र जोर धरू लागली आहे.