Mangaon : शिपुरकर आणि वाघरे शाळेत वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा करण्याची अभिनव पद्धत : पुस्तक भेट उपक्रमास पालकांचा उत्तम प्रतिसाद
Mangaon : शिपुरकर आणि वाघरे शाळेत वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा करण्याची अभिनव पद्धत : पुस्तक भेट उपक्रमास पालकांचा उत्तम प्रतिसाद
माणगांव येथील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सुधाकर नारायण शिपुरकर आणि गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेला विविध पुस्तके भेट देऊन आपला वाढदिवस साजरा करतात. या अभिनव संकल्पनेचा पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पारंपारिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी, या उद्देशाने शाळेने या उपक्रमाची सुरुवात केली आहे. चेअरमन अरुण पवार आणि मुख्याध्यापिका मनिषा मोरे यांनी पालकांना आवाहन केले की, आपल्या पाल्याचा वाढदिवस शाळेत चॉकलेट न देता कोणतेही जुने किंवा नवीन पुस्तक, कथा, कांदबरी, ग्रंथ, अंक, कथासंग्रह, बालसाहित्य भेट म्हणून द्यावे.
वाचनाने संस्कारक्षम आणि ज्ञानवर्धन
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचन विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि स्वयंपूर्ण बनवते. मोबाईलच्या आहारी गेलेल्या आताच्या पिढीच्या हातात पुस्तके देऊन त्यांचे ज्ञान वाढवणे हाच या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे शाळेच्या ग्रंथालयात नव्या पुस्तकांची भर पडत असून, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागते.
पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमात सई डवले, माही डवले, देवांग आहीरे, अनन्या तायडे, आर्या फाटक यांसारख्या विद्यार्थ्यांनी शाळेला विविध पुस्तके भेट दिली आहेत. त्यामुळे शाळेची ग्रंथसंपदा अधिक समृद्ध होत आहे. चेअरमन अरुण पवार यांनी या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे आभार मानले असून, शहरातील नागरिकांनीही शाळेला पुस्तके देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान, संस्कार आणि वाचनाची आवड वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.