बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, कोर्टात सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण युक्तिवाद करत आरोपींच्या कबुलीजबाबांवर प्रकाश टाकला आहे.
आरोपींनी कबुली दिली
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर, जयराम चाटे आणि महेश केदार यांनीही हत्येची कबुली दिली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुदर्शन घुले हाच टोळीचा प्रमुख असल्याचे न्यायालयात सांगितले.
खंडणीपासून हत्येपर्यंतचा घटनाक्रम स्पष्ट
बुधवारी बीडच्या विशेष हत्या मकोका न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी अॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणीपासून हत्येपर्यंत संपूर्ण घटनाक्रम मांडला. त्यांनी न्यायालयासमोर सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, तसेच ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग यांसारखे महत्त्वाचे पुरावे असल्याचे सांगितले. आरोपींच्या वकिलांनी हे पुरावे मिळवण्यासाठी अर्ज केला असून, पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
कटाचा खुलासा – “कायमचा धडा शिकवा”
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. तपासात असेही समोर आले आहे की, ८ डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा, नांदूर फाटा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची बैठक झाली होती. त्या वेळी विष्णू चाटे यांनी “संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडथळा ठरत आहेत” असे सांगितले, त्यावर “कायमचा धडा शिकवा” असे ठरवण्यात आले.
या संपूर्ण कटाला वाल्मीक कराडने गाईड केल्याचे सीडीआर तपासातून स्पष्ट झाले आहे. तसेच, फरार आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांना तीन वेळा फोन केला होता. उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादानुसार, आरोपींनी आधी आवाडा कंपनीच्या वॉचमनला मारहाण करून आपली ताकद दाखवली होती.
या खळबळजनक प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.