
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरानकरांसाठी एक अत्यावश्यक असा मलनिस्सारण प्रकल्प ( एसटीपी प्लान )मार्गी लावला जात असून संबंधीत ठेकेदाराकडून आता नियोजनबद्ध कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सुरुवातीला ठेकेदाराला या गावातील एकंदरीत भौगोलिक परिस्थितीची पूर्ण कल्पना नसल्याने नेमून दिल्याप्रमाणे त्यांनी कामाचा सपाटा सुरू होता. मलनिस्सारण पाईप लाईन टाकताना अनेक ठिकाणी विद्युत जोडण्या त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची भूमिगत कनेक्शन आहेत त्या सर्व कनेक्शनला लागून ही मलनिस्सारण पाईप लाईन टाकण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात काही बिघाड झाल्यास पुढील खर्चाचा बोजा नगरपरिषदेला सोसावा लागणार होता.
याकामी गावाचे हित पाहणाऱ्या भूमिपुत्रांनी निकृष्ठ दर्जाच्या कामावर हरकत घेतली होती. याबाबत मुख्याधिकारी यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठेकेदाराने सर्व परिस्थिती जाणून घेतली. एवढेच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. त्या ठिकाणी जे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते होते त्यावर पुन्हा ब्लॉक लावू नये असा काही विघ्नसंतोषी लोकांनी ठेकेदाराला नेहमीप्रमाणे चिरीमिरी साठी वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
परंतु गावातील काही सुज्ञ जनहित पाहणाऱ्या लोकांनी इथल्या पर्जन्यवृष्टीमुळे हे रस्ते पूर्णपणे वाहून जातील आणि लोकांच्या घरात पावसाचे पाणी जाऊन नुकसान होईल असे सांगितल्यावर तेव्हा कुठे ही ब्लॉक लावण्याची कामे सुरू झाली आहेत, अन्यथा चिरीमिरी साठी झटणाऱ्या मंडळींमुळे पावसाळ्यात रस्त्याची दाणादाण झाली असती एवढं मात्र नक्की. माथेरान मध्ये कधी नव्हे एवढा जवळपास पन्नास कोटींपेक्षाही अधिक निधी या मलनिस्सारण प्रकल्पासाठी मंजूर झाला आहे.
याच माध्यमातून गावातील स्वच्छता त्याचप्रमाणे लोकांचे आरोग्य चांगले राहणार आहे. सद्यस्थितीत ठेकेदाराकडून खोदाई झालेल्या रस्त्यावर पूर्ववत ब्लॉक लावण्यात येत असून त्यासाठी स्वतः ठेकेदार जातीने लक्ष केंद्रित करत आहेत त्यामुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
—————————————————–
एसटीपी ठेकेदारीनी खोदलेल्या रस्त्याची खड्डे प्रेस करून ब्लॉक लावायला घेतले आहेत. याच पद्धतीने जलद गतीने कामे करून घ्यावीत त्यामुळे येणाऱ्या पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांना व वयोवृद्ध नागरिक, घोडेवाले, रिक्षावाले यांना व्यवस्थित चालायला सोयीस्कर होईल.
…राकेश कोकळे, माजी अध्यक्ष धनगर समाज माथेरान