
सोगाव (अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील मांडवा जेट्टी जवळपास कोळगाव येथील रिलायन्स कंपनीच्या साईट समोरील समुद्रकिनारी कांदळवनाच्या झुडुपात गुरुवार दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास अंदाजे ४० ते ४५ वयाच्या पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून याबाबतची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे नवेदर कोळगाव पोलीस पाटील प्रियांका प्रशांत गावंड यांनी दिली आहे. याची माहिती मिळताच मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून कुजलेला मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
पंचनामा करताना मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारचे ओळख असलेले कागदपत्रे व इतर तत्सम वस्तू मिळाले नसून अंगावर काळपट चौकटीचा रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेली दिसून आली आहे. सदरचा मृत व्यक्ती समुद्राच्या पाण्यात बुडून मरण पावल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाण्यात अंमलदार म.पो.हवा. ए. व्ही. कराडे यांनी २६ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता अकस्मित मृत्यू रजि. नं. व कलम १९/२०२४ भा. ना.सु.सु.१९४ प्रमाणे नोंद केली असून अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीक अंमलदार सचिन वाणी, पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत.
सदर मृत व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहीत असल्यास मांडवा पोलीस ठाण्यातील अंमलदार सचिन वाणी, पोलीस उपनिरीक्षक ८३२९७६५८६५ यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.