
अलिबाग ( अमुल कुमार जैन ) :
रायगड जिल्ह्यातील वडखळ पोयनाड मार्गावर असणाऱ्या धरमतर पुलनजिक मोटर सायकल आणि डंपर यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मनोज गणेश नाईक (वय 22 म्हात्रोली आदिवासी वाडी )हा मयत झाला असून दीपक नामदेव नाईक ,गणेश यशवंत वाघमारे (म्हात्रोली आदिवासी वाडी, अलिबाग, रायगड)हे जखमी झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक 1 ऑक्टोंबर 2024 रोजी अंदाजे सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मयत मनोज गणेश नाईक हा त्याचे दोन सहकारी दीपक नामदेव नाईक ,गणेश यशवंत वाघमारे यांच्यासमवेत मोटर सायकल वरून वडखळ बाजूकडून पोयनाड बाजूकडे येत असताना अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलिस स्टेशन हद्दीतील धरमतर पुलनजिक समोरून येणाऱ्या डंपरच्या समोरच्या भागात मोटर सायकल जावून भीषण अपघात झाला.
या अपघातात मनोज गणेश नाईक (वय 22 म्हात्रोली आदिवासी वाडी )हा जागीच मयत झाला असून दीपक नामदेव नाईक ,गणेश यशवंत वाघमारे जखमी झाल्याने त्यांना वडखळ येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोयनाड पोलिस ठाण्याचे कर्मचारी काही मिनिटात घटना स्थळी पोहचले असून पोलिस शिपाई समीर म्हात्रे यांनी मयत मनोज गणेश नाईक याचा मृतदेह घेवुन शवविच्छेदन साठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणला. या बाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.