Alibag : अजंठा बोटीत पाणी शिरल्यानं धोकादायक परिस्थिती; 130 प्रवाश्यांचा जीव वाचवण्यात यश!

Ajantha Boat
अलिबाग (अमुलकुमार जैन) :
अलिबागजवळ मांडवा समुद्रात काल सायंकाळी अजंठा कंपनीच्या प्रवासी कॅटमरॉन बोटीमध्ये पाणी शिरल्याने निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सागरी मंडळाने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून ती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
सदर बोट गेटवे ऑफ इंडिया येथून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास 130 प्रवाशांसह मांडवा जेट्टीकडे रवाना झाली होती. मात्र मांडवा जेट्टीपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असताना बोटीमध्ये समुद्राचे पाणी शिरले. या वेळी बोटीवरील कर्मचार्‍यांनी तातडीने मदत मागवली. जवळील इतर बोटींच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूपरीत्या मांडवा जेट्टीवर पोहचवण्यात आले. ही घटना घडली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे समाधानकारक आहे. मात्र प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.
घटनेनंतर तत्काळ कारवाई करत प्रशासनाने सदर बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना, नोंदणी प्रमाणपत्र व सर्वे प्रमाणपत्र निलंबित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत बोटीस प्रवासी वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांनी जाहीर केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष सागरी अभियंता व चीफ सर्वेअर प्रकाश चव्हाण असणार आहेत. बांद्रा येथील प्रादेशिक बंदर अधिकारी सी. जे. लेपांडे व सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी कमांडंट संतोष नायर हे सदस्य म्हणून काम पाहतील. ही समिती घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून शिफारसींसह अहवाल सादर करणार आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली असून, भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी बोटींच्या नोंदणी प्रक्रियेबाबत तसेच तांत्रिक बाबींवर आधारित सुस्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही हलगर्जी माफ केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading