होळीचा सण… कोकणवासियांचा आनंदसोहळा; उखी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत उत्साहाला उधाण

Poladpur Holi
पोलादपूर (शैलेश पालकर) :
कोकणाचे प्रवेशद्वार रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका असून खऱ्या अर्थाने होलिकोत्सवासाठी गणेशोत्सवापाठोपाठ मोठया संख्येने उपस्थित राहतात. ग्रामदैवतांच्या पालख्या आणि होळीच्या फागा म्हणजेच बोंबा…देवाला गाऱ्हाणं आणि नमन, खेळे, मेळे, शंकासूर तसेच शरणं यांचा परमोच्च आनंदसोहळा या काळात अनुभवण्यासाठी कोकणी असावं लागतं.
उखी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमेच्या आधीच्या माघ महिन्यामधील पौर्णिमा असते. या पौर्णिमेपासून काठी लाठी बनाटी, पेटते गोळे फिरविणे, गोलाकार मोठे दगड उचलून कसरत करणे, दांडपट्टा, भालाफेक व तलवारबाजी तसेच अन्य मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्याची सुरूवात मानली जाते. माघ महिना संपल्यानंतर फाल्गून महिन्याच्या सुरूवातीपासून पहिली होळी दुसरी होळी असे जसजसे दिवस सरतील तशा होळीच्या मोठया होमापर्यंतची वाटचाल सुरू होते. होळीच्या आधीच्या दिवशी चोरहळकुंडाची मजा गावाकडे औरच असते. होळी पौर्णिमेला मोठा होम पेटवताना सावरीचे झाड मध्यभागी ठेवुन अनेक पेंढे आणि लाकडांचा ढिग रचून नवस बोलून आधी घरोघरी नंतर गावाची होळी पेटविण्याची प्रथा आहे. पेटत्या होळीमध्ये नारळ फेकून होलिकाप्रज्वलनानंतर हे नारळ काठीने बाहेर काढण्याची परंपरा देखील अस्तित्वात आहे. होळीच्या आधी किंवा नंतर ग्रामप्रदक्षिणेची पालखी नाचविण्याचा प्रकार कोकणात प्रचंड रूढ असला तरी संकासूराच्या हातातील दोरीचा फटका आशीर्वाद म्हणून स्विकारण्याची प्रथा तळकोकणात जाताना अनुभवण्यास मिळते. गोमूचे नृत्य म्हणजे पुरूषांनी केलेले स्त्रीवेशभूषेतील नृत्य हे देखील कोकणी परंपरेचे वैशिष्ठय आहे.
पुरणपोळी, कटाची आमटी या पारंपरिक खाद्यपदार्थासह होळीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहारासोबत मद्य व काही क्वचित ठिकाणीच बमबमभोलेचा प्रसाद भक्षण करून रंगकाभंग आस्वाद घेत धूळवड साजरी करण्यात येते. ग्रामदैवतांच्या पालख्या काही ठिकाणी होळीच्या आधीपासूनच गाववाडयांमध्ये फिरतात तर काही ठिकाणी होळीच्या दिवशी सहाणेवर आलेल्या पालखीचे दर्शन चाकरमानी आणि ग्रामस्थ घेतात आणि रंगपंचमीला देवांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा होते. ग्रामदैवतांमध्ये काळभैरवनाथ, जोगेश्वरी, भैरीभवानी, रवळनाथ तसेच कालिकामाता, काळूबाई, जननीआई म्हणजेच आदिवशक्ती रूपातील देवी आणि शंकरमहादेवांच्या पिढीतील देव यांचा समावेश पालख्यांमध्ये दिसून येत असतो. काही गावांमध्ये पालखी सोबत सासनकाठी नाचविण्याची परंपरा असून अलिकडे या प्रथेला खेळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवाचा गोंधळ घालण्याची प्रथा देखील काही गावांमध्ये अस्तित्वात असली तरी  मानपानांच्या बाबींचाही मानकरी व सेवेकरी असा पगडा या प्रथांवर दिसून येत असतो. देवीच्या पालखीसमोर लहान मुलांना खेळी भेटविण्याची प्रथादेखील कोकणात आहे.
ग्रामदैवतांच्या उत्सवाची वर्गणी गोळा करण्यासोबतच अनेक ठिकाणी ग्रामसेवक घरपट्टीच्या रक्कमेसाठी फिरताना दिसतात. कोकणातील मुळ गांवांत राहणारे परंतू नोकरी व्यवसायासाठी मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, पनवेल, कल्याण तसेच शहरी भागात राहणाऱ्या चाकरमान्यांचे होलिकोत्सव हे गावातील स्नेहसंमेलनच असते. या सणातील भेटीगाठीत एकाच समाजातील दूरदूरचे चाकरमानी भेटल्यावर मुलामुलींच्या विवाहाची बोलणी होऊन सोयरिकीदेखील जुळतात. आज गुरूवारपासून कोकणात या होलिकोत्सवाच्या आनंदाला उधाण येण्यास सुरूवात होणार आहे. संवेदनशील गावांतील होलिकोत्सव पोलीस बंदोबस्तात होणार असून या गावांतील प्रथा परंपरांना काही वर्षे खीळ बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading